आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झोमॅटो मारहाण प्रकरणात मंगळवारी आणखी एक ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेच्याच विरोधात आता FIR दाखल करण्यात आला आहे. महिलेने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ जारी करून डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचे आरोप केले होते. पण, इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, त्या महिलेनेच डिलिव्हरी बॉयला आधी चपलेने मारहाण केली. त्याला शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याच्याच विरोधात खोटी तक्रार दाखल केली.
बंगळुरूत ऑनलाइन कंटेंट क्रिएटर हितेशा चंद्रानी हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केले होता. तेव्हापासूनच ती देशभर चर्चेत आहे. तिने डिलिव्हरी बॉयवर आरोप केल्यानंतर सगळेच तिच्या समर्थनात उतरले होते. संबंधित डिलिव्हरी बॉयला अटकही करण्यात आली. पण, डिलिव्हरी बॉयने आपली बाजू मांडल्यानंतर प्रकरणात यू टर्न आले. तसेच स्वतःला जखमी करून तिने डिलिव्हरी बॉयवर खोटे आरोप केले असा नवीन दावा करण्यात आला.
डिलिव्हरी बॉयने काय म्हटले?
बंगळुरूत राहणारा डिलिव्हरी बॉय कामराज याने सांगितल्याप्रमाणे, "त्या दिवशी ट्रॅफिक असल्याने तो डिलिव्हरी करण्यासाठी उशीर झाला होता. पोहोचलो तेव्हा मी त्या महिलेची माफी मागितली. पण, तिने माझ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिने मला फूड डिलिव्हरीचे पैसे देण्यासही नकार दिला. त्यावर मी तिला जेवण परत करण्यास सांगितले. तेव्हा तिने ते परत करण्यासही स्पष्ट नकार दिला. वाद घालताना तिने मला आपली चप्पल उचलून मारण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला वाचवत होतो. याच दरम्यान तिच्या नाकाला तिचा हात लागला आणि तिच्याच हातातील रिंगने नाकाला जखम झाली."
डिलिव्हरी बॉयच्या समर्थनात परिणीती चोप्रा
डिलिव्हरी बॉयच्या समर्थनात सामान्य माणसांसह अभिनेत्री परिणीती चोप्रा सुद्धा उतरली. तिने आरोपी महिलेला अटक करण्याची मागणी केली. सोबतच, कामराजच्या नोकरीवर चिंता व्यक्त करताना झोमॅटोला विनंती केली की सत्य बाहेर काढून ते साऱ्या जगासमोर जाहीर करा. ही घटना अतिशय अमानवीय आणि लज्जास्पद असल्याचे तिने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर आपण यात कशा प्रकारे मदत करू शकतो अशी विचारपूस देखील तिने केली.
10 मार्च रोजी जारी केला होता व्हिडिओ
10 मार्च रोजी हितेश चंद्रानी हिने आपल्या जखमी नाकासह एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने आरोप केला होता की झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय एका तासानंतरही पोहोचला नसल्याने तिने कस्टमर केअरला फोन करून ऑर्डर रद्द केली. थोड्या वेळानंतर तो डिलिव्हरी बॉय जेवणाचे पार्सल घेऊन आला. ऑर्डर रद्द केल्याचे सांगत तिने जेवण परत करणार नाही तसेच याबद्दल कस्टमर केअरशी बोलत आहे असे सांगितले. पण, यावेळी डिलिव्हरी बॉयने वाद घातला आणि तिच्या नाकावर पंच मारून तेथून पसार झाला असे तिने व्हिडिओमध्ये सांगितले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.