आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद:आधी पूंछमध्ये हल्ला, नंतर राजौरीत घुसले पाक अतिरेकी; 5 जवान शहीद, राजौरीमध्ये मोबाइल इंटरनेट बंद

जम्मूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मूच्या पूंछ येथील तोतावाली गल्ली परिसरात २० एप्रिलला भारतीय लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनीच शुक्रवारी राजौरीच्या कंडी येथे सैन्यावर हल्ला केला. पूंछमधील गुन्हेगार अतिरेक्यांच्या शोधासाठी लष्कराने गुप्त माहितीवरून कंडी येथे शोधमोहीम हाती घेतली होती. सूत्रानुसार पूंछमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांत दोन पाकिस्तान व इतर सहा स्थानिक आहेत. ते प्रत्येक चारच्या गटाने चालत होते.

पूंछमध्ये हल्ला केल्यानंतर दहशतवादी ७५ किमी अंतर पार करून जंगलातील एका गुफेत दडून बसले होते. लष्कराने घेराव घातल्याचे लक्षात आल्याने दहशतवाद्यांनी बाॅम्बने हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात काही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता आहे. अतिरेक्यांनी पाकिस्तानजवळील जम्मूच्या पूंछ व राजौरीमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचलेला होता.

एलआेसी पार करून पाकिस्तानात पळून जाण्याचे मनसुबे निश्चितच नव्हते. पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत स्थानिक अतिरेकीही होते. त्यामुळे जंगलासारख्या भागातून ते जाऊ शकले. श्रीनगरमध्ये २२ ते २४ मे पर्यंत जी-२० बैठक व एक जुलैपासून होणाऱ्या अमरनाथ यात्रेपूर्वी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशत पसरवण्याचे मनसुबे आहेत. सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होताना दिसतात. परंतु गेल्या काही महिन्यांत हे प्रयत्न कमी झालेले होते. आता पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

लान्स नाईक रुचिन सिंग, नाईक अरविंद कुमार, हवालदार नीलम सिंग आणि पॅराट्रूपर सिद्धांत छेत्री, प्रमोद नेगी अशी शहीद जवानांची नावे आहेत.
लान्स नाईक रुचिन सिंग, नाईक अरविंद कुमार, हवालदार नीलम सिंग आणि पॅराट्रूपर सिद्धांत छेत्री, प्रमोद नेगी अशी शहीद जवानांची नावे आहेत.

जंगलात दडून बसलेल्या सापळ्यात अडकवून हल्ला
राजौरीच्या कंडी येथील वनक्षेत्रात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लष्करी शोधमोहिमेवर बाॅम्बने हल्ला केला. त्यात पाच जवान शहीद झाले. एक गंभीर जखमी आहे. अतिरेक्यांच्या शोधात निमलष्करी दल, पोलिस आहे. प्रशासनाने राजौरीमध्ये मोबाइल इंटरनेट बंद केले आहे.

पाकशी कसलीही चर्चा करणार नाही : जयशंकर
दहशतवाद पोसणाऱ्यांशी व त्यांना आश्रय देणाऱ्यांशी (पाकिस्तान) आम्हाला काहीच बोलायचे नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शुक्रवारी सुनावले. गोव्यात शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आम्ही अतिरेक्यांचा दंश सहन केला आहे. दहशतवादाला पोसणारे स्वत:च पीडित असल्याचे ढोंग करत आहेत.

राजौरी हल्ल्याबाबत विचारले असता परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची पतही त्याच्या तिजोरीप्रमाणे रिकामी आहे. पाकिस्तान जगभरात अतिरेकी फॅक्टरीचा सर्वात मोठा पाठीराखा आहे. ते म्हणाले, भारत क्रॉस बॉर्डर टेररचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बिलावल यांच्याशी वन टू वन बैठकीत जयशंकर म्हणाले, एससीओ बहुपक्षीय व्यासपीठ आहे, द्विपक्षीय नाही. भारत आणि चीनमधील संबंध सामान्य नसल्याचे जयशंकर यांनी मान्य केले. चीनने लडाखमधून सैन्य मागे घ्यावे.

आता केवळ पीओके रिकामे करण्यावर चर्चा
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानशी काश्मीर मुद्द्यावर भारत कोणतीच चर्चा करणार नाही. आता केवळ अवैधरीत्या बळकावलेल्या पीओकेचा (पाकव्याप्त काश्मीर) ताबा पाकिस्तान कधी सोडणार, यावरच चर्चा होईल.