आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात ३० मार्च २०२० नंतर सोमवारी प्रथमच एकही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत देशामध्ये एकूण ६२५ नवे कोरोना रुग्ण आढळले. ही संख्याही ९ एप्रिल २०२० नंतर सर्वात कमी आहे. आता देशामध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार आहे. ही संख्या एप्रिल २०२२ च्या तुलनेत थोडी जास्त आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार पुढील दोन-तीन आठवड्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५ हजाराने खाली येईल तेव्हा देश कोरोनामुक्त होण्याच्या जवळ जाईल. भारतात कोरोनाने रोज होणारे मृत्यू आता केवळ ०.२४% आहेत. म्हणजे ४०० नव्या रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाचाच मृत्यू होत आहे. चांगली बाब म्हणजे जगातील सर्वच देशांत मृत्यूदर ०.५ टक्क्यांच्या खाली आहे.
देश : कोरोनाची अडीच वर्षे
सर्वाधिक हानी झाली अमेरिकेमध्ये
चीनमधून कोरोना विषाणूचा जगभर संसर्ग सुरू झाल्यानंतर जगात एकूण ६३.३ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९.८ कोटी लोक एकट्या अमेरिकेत या संसर्गाने बाधित झाले. जगामध्ये कोरोनामुळे एकूण ६६ लाख मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगते. पैकी १०.७ लाख मृत्यू एकट्या अमेरिकेमध्ये झाले आहेत.
महाराष्ट्रात सोमवारी ९१ रुग्णांचे निदान, कुठेही मृत्यूची नोंद नाही
संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट सकारात्मक संकेत आहेत. यात महाराष्ट्रातही सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सोमवारी राज्यात एकूण ९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी मात्र, राज्यात दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर, या दिवशी १८८ नव्या रुग्णांचे निदान झाले. सध्या एकूण १ हजार ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६% आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे या प्रमुख शहरांमध्ये कोराेनाच्या संसर्गाचा वेग पूर्वी अधिक होता. तो आता अत्यंत कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. तरीही इतर शहरांच्या तुलनेत आजही या शहरांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. राज्यात आजवर ८१३३६८२ बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७९८३८६८ रुग्ण बरे होऊन परतले आहेत.
मंगळवारची स्थिती अशी
राज्यात मंगळवारी २९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबई शहरात ३९६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ठाण्यात ही संख्या ३०५ एवढी आहे. पुण्यात ३९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये ३३, जळगावमध्ये ४, धुळ्यात १, औरंगाबादेत १५ तर सोलापूरमध्ये २९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.