आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने अनेक पातळ्यांवर सकारात्मक बाबी सुरू झाल्या आहेत. अडीच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीत आले असून मंगळवारी सिंधू नदीच्या जलवाटपावर स्थायी आयोगाची दोनदिवसीय बैठक सुरू झाली. भारतीय अधिकाऱ्यांनुसार, या बैठकीमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडले आहे.
पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल बालाकोट एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशांत होत असलेली ही पहिलीच बैठक आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, अजून बऱ्याच गोष्टी पाइपलाइनमध्ये आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बॅनरखाली पाकच्या पब्बी भागात दहशतवादविरोधी युद्धसराव होईल. यात भारतीय लष्कर सहभागी होणार आहे. याची शासकीय पातळीवर घोषणा झाली नसली तरी भारत यातून माघार घेणार नाही. कारण, एससीओ हा रशियाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. माॅस्कोची नाराजी घेणे भारताला मान्य नाही. म्हणूनच फाळणीनंतर प्रथमच भारत-पाक मैत्रीपूर्ण युद्धसरावात सहभागी होतील. भारत-पाक संबंध रुळावर यावेत म्हणून यूएई आणि सौदी अरेबियाने मुख्य भूमिका बजावली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी मौन बाळगून असले तरी तसे संकेत ते देत आहेत.
भारत-पाक संबंधांत ही प्रगती अचानक झालेली नाही. यासाठी दीर्घ प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३० मार्चला ताजिकिस्तानची राजधानी दुशानबेमध्ये हार्ट एशिया परिषद होत आहे. यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी सहभागी होतील तेव्हा दोघांत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दहशतवाद-आयएसआयवर पाकने लगाम लावला तरच शांतता शक्य
‘भारत-पाक संबंधांबाबत सुरू असलेल्या सकारात्मक हालचालींत अनेक किंतु-परंतु आहेत. आता आगामी काळात पाकमध्ये नेतृत्व आणि त्याहून अधिक लष्कराची अग्निपरीक्षा आहे. पूर्वीच्या अनुभवांतून आपण पाहिले आहे की, अशा वेळी पाक काहीतरी कुरापती काढतो, परंतु दहशतवादाला आपल्या सरकारी रणनीतीचा एक भाग म्हणून वापरण्याचा लष्कराचा मोह सुटत नाही. यामुळेच दोन्ही देशांतील संबंध बिघडतात. तरीही भारतीय लष्कर पाकमध्ये युद्धसराव करत असेल तर हा ऐतिहासिक टप्पा आहे. आता पाकला तेथील सक्रिय दहशतवादी गट आणि आयएसआयच्या बेलगाम कारवायांना कसोशीने लगाम लावावा लागेल.’
लक्षात घेण्यासारख्या ३ गोष्टी, याच सुधारणेचा आधार ठरताहेत
1. युद्धबंदीचे २५ फेब्रुवारीनंतर उल्लंघन नाही, १ ते २५ फेब्रुवारीपर्यंत २५५ वेळा उल्लंघन
२५ फेब्रुवारीला दोन्ही देशांतील लष्कराच्या महासंचालकांनी हॉटलाइनवर चर्चा केली होती. सीमेवर युद्धबंदी पाळू, असे चर्चेत ठरले. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी तोफा शांत आहेत. तर, १ ते २५ फेब्रुवारीपर्यंत युद्धबंदीचे तब्बल २२५ वेळा उल्लंघन झाले होते. यापूर्वी जानेवारीमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर एकूण ३३६ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.
2. दोन्ही देशांचे प्रमुख नेते वादग्रस्त वक्तव्ये करत नाहीत, भारतात निवडणुकीतही पाक मुद्दा आला नाही
पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा सध्या अगदी नरमाईने वक्तव्ये करत आहेत. इम्रानना कोरोना झाला तेव्हा लगेच नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून विचारपूस केली. विशेष म्हणजे भारतात पाच राज्यांत निवडणूक वातावरण असताना भारतीय नेत्यांनी पाकबाबत किंवा बलुचिस्तानबाबत अद्याप चकार शब्द काढलेला नाही.
3. मोदींनी इम्रानना पाकिस्तानदिनी शुभेच्छा दिल्या, दिल्लीत झाला समारंभ
दिल्लीस्थित पाक वकिलातीत मंगळवारी पाकिस्तान दिन साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त इम्रान यांना शुभेच्छा दिल्या. पाकच्या प्रभारी उच्चायुक्तांनी येथे नव्या नियुक्त्यांचे संकेत दिले.
अरब राष्ट्रांच्या मध्यस्थीने ३ मुद्द्यांवर सहमती
1. दोन्ही देशांचे नेते वादग्रस्त विधाने टाळतील. पाक नव्या संबंधांचा प्रस्ताव मांडेल, भारत तो स्वीकारेल.
2. भारतात सीएएविरोधी निदर्शनांत पाकमधून निधी मिळाल्याचे पुरावे आढळल्यास चर्चा थांबवणार.
3. बलुचिस्तानच्या मुद्द्यावर भारत आगामी काळात कोणत्याही व्यासपीठावरून भाष्य करणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.