आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यामागून धक्के बसत आहेत. माजी मंत्री तथा जालन्याचे शिवसेनेचे बडे नेते अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात अगोदरच खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेला जबर झटका बसला आहे.
उद्धव ठाकरेंशी चर्चा
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. आज सकाळी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती दिली. संजय राऊतांशीही बोललो. सगळ्यांची मते जाणून घेऊन मी शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला,' असे खोतकर म्हणाले.
'समर्थन केलं म्हणजे संबंध थोडीच तुटतात, आमचे 40 वर्षांचे संबंध आहेत. मी पक्ष प्रमुखांना चार वेळा फोन केला, त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना पूर्ण कल्पना दिली,' असेही खोतकर म्हणाले.
कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे निर्णय
'घरी आलो की कुटुंब दिसते. त्यामुळे काही टोस निर्णय घेणे गरजेचे होते. या गोष्टी मी उद्धव ठाकरेंच्याही कानावर घातल्या. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे,' असे खोतकर म्हणाले.
शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली
'आजपर्यंत शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी सेनेचे जालन्यात वर्चस्व निर्माण केले. सामान्य माणसांनीही आमच्यावर विश्वास टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांनी आमच्या झोळीत भरभरून मतदान टाकले. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला,' असेही ते यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री दानवेंसोबत दिलजमाई
दानवेंसोबत दिलजमाईवर खोतकर म्हणाले की, 'शत्रू असला तरी आपण त्याच्याकडे चहा घेतो. तिथे गेल्यावर बोलता बोलता सर्व विषय निघाले.' खोतकर म्हणाले की, 'लोकसभेचा आग्रह सोडलेला नाही. हा प्रश्न आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडे मांडला आहे. ते निर्णय घेतील. मी एकाही शिवसैनिकाला आपल्यासोबत येण्याचे सांगितले नाही.' उपनेतेपदाचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर खोतकरांनी 'आता शिंदे गटात आल्यावर राजीनामा द्यावाच लागेल,' असे स्पष्ट केले.
जालना शुगर फॅक्ट्रीमुळे अडचणीत
'मी जालना शुगर फॅक्ट्रीचा व्यवहारामुळे अडचणीत आलो. तापडियांनी 2012 मध्ये 42 कोटींना कारखाना विकत घेतला. त्यानंतर अजित सिड्सने माझ्या मध्यस्थीने हा कारखाना 44 कोटींना विकत घेतला. यातील 75 टक्के रक्कम त्यांनी स्वतः दिली. त्यामुळे कारखाना त्यांच्या नावे झाला. त्यानंतर पुन्हा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही कारखान्यात 7 कोटींची गुंतवणूक केली. यातील 5 कोटी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले. तर उर्वरित रकम कुटुंबातून उभी केली. यात कोणताही गैरव्यवहार नाही,' असेही खोतकरांनी यावेळी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.