आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gadkari Shivaraj Ousted From Parliamentary Board; Fadnavis Appointed To Central Election Committee

भाजपमध्ये मोठे बदल:गडकरी - शिवराज यांना संसदीय मंडळातून डच्चू; फडणवीसांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने संघटना स्तरावर बुधवारी सर्वात मोठा फेरबदल केला आहे. त्याअंतर्गत पक्षाने संसदीय मं‌डळ या आपल्या सर्वोच्च धोरण निर्धारक समितीत केंद्रीय मंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्थान दिले नाही. नितीन गडकरी यांनी 24 दिवसांपूर्वी म्हणजे 24 जुलैला नागपूरमधील एका कार्यक्रमात ‘आता राजकारण सोडावेसे वाटते,’ असे वक्तव्य केले होते. त्यांनी असेही म्हटले होते की, महात्मा गांधीजींच्या वेळचे राजकारण आणि आजचे राजकारण यात खूप मोठा बदल झाला आहे. तेव्हा राजकारण देश, समाज आणि विकासासाठी होत होते, पण आता राजकारण फक्त सत्तेसाठी केले जाते.

गडकरी यांच्या या वक्तव्याला अद्याप एक महिनाही पूर्ण झाला नाही तोच पक्षाच्या सर्वात शक्तिशाली समितीतून (केंद्रीय संसदीय मंडळ) गडकरी यांना वगळण्यात आले आहे. गडकरींच्या जागी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक समितीचीही फेररचना करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा समावेश केला आहे. गडकरी आणि शिवराज हे केंद्रीय निवडणूक समितीतही नाहीत. हा बदल या वर्षी होणाऱ्या गुजरात, हिमाचल आणि पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक या राज्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. संसदीय मंडळात ओबीसी आघाडीचे अध्यक्ष के. लक्ष्मण, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा, राष्ट्रीय सचिव सुधा यादव, माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांचा समावेश करण्यात आला आहे. लालपुरा संसदीय मंडळात पहिले शीख प्रतिनिधी आहेत. जटिया यापूर्वीही मंडळात होते. निवडणूक समितीत संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचा समावेश असतो. त्याशिवाय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, ओम माथूर आणि बनथी श्रीनिवास या नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

कमी वयाच्या लोकांच्या जागी वृद्ध

2014 आणि 2022 मध्ये संसदीय बोर्डात झालेल्या बदलात मोठा फरक आहे. यंदा बोर्डात वयस्कर नेत्यांनाही स्थान दिले आहे. तेदेखील अपेक्षेनुसार कमी वयाच्या नेत्यांना हटवून. येदियुरप्पा, सत्यनारायण जटिया, के. लक्ष्मण, राजनाथसिंह, इक्बालसिंह लालपुरा यांचे वय 70 ते 79 वर्षे आहे.

...2014 मध्ये बाहेर पडले

भाजपमध्ये यापेक्षा मोठा बदल 2014मध्ये तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना संसदीय बोर्डातून हटवत मार्गदर्शक मंडळात पाठवले होते. तेव्हा हा पक्ष-संघटनेचा पिढी बदल म्हटले होते.

यंदा सदस्य खास :

11 सदस्यीय बोर्डामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी, दलित... : 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर संसदीय बोर्डात जितके बदल झाले त्यात पहिल्यांदाच प्रादेशिक व सामाजिक संतुलन साधण्यात आले. सोनोवाल यांच्या रूपात ईशान्येतील पहिले नेते आणि लालपुरा यांच्या रूपात शीख पहिल्यांदा संसदीय बोर्डात आले आहेत. 11 सदस्यीय बोर्डात जे. पी. नड्‌डा ब्राह्मण, राजनाथसिंह क्षत्रिय, पीएम मोदी ओबीसी, सत्यनारायण जटिया दलित, के. लक्ष्मण आणि सुधा यादव ओबीसींचे प्रतिनिधित्व करत आहेत. लिंगायत समुदायाचे येदियुरप्पा यांनाही प्रतिनिधित्व मिळाले. शिवराज संसदीय बोर्ड व निवडणूक समितीतून बाहेर पडल्यानंतर आता भाजपच्या प्रमुख समित्यांमध्ये कुणीही मुख्यमंत्री राहिलेला नाही.

येथूनच प्रतिनिधित्व
भाजपने धोरण निश्चितीत दक्षिण, पश्चिम आणि ईशान्य भारतावर फोकस ठेवला आहे. बी. एल. संतोष, येदियुरप्पा, लक्ष्मण आणि वनथी श्रीनिवास दक्षिणेचे आहेत. पश्चिमेतून पीएम नरेंद्र मोदी, अमित शहा, भूपेंद्र यादव, ओम माथूर, देवेंद्र फडणवीस आहेत. उत्तर भारतातून जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह आणि इक्बालसिंह लालपुरा यांच्याशिवाय सुधा यादव आहेत. ईशान्येतून प्रथमच सर्वानंद सोनोवाल मंडळात आले आहेत, तर मप्रमधून सत्यनारायण जटिया एकमेव सदस्य आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर मंडळात महिलांचे प्रतिनिधित्व नव्हते. सुधा यादव यांच्या रूपाने ते भरले आहे. जटिया दलित आहेत.75 वर्षांवरील येदियुरप्पा यांचे नाव आश्चर्यकारक आहे.

पक्षाचा निर्णय मान्यऱ्यांचा सन्मान
बदलामुळे दोन गोष्टी स्पष्ट आहेत. पहिली, शक्तिशाली नेता असला तरी तो अनिवार्य नाही. दुसरी, पक्षाचा निर्णय जो विनाअट मान्य करेल, त्याचा सन्मान राखला जाईल. संसदीय मंड‌ळात सीएमपद सोडणारे येदियुरप्पा आणि सोनोवाल यांना आणि निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आणून महत्त्व दिले आहे. फडणवीस यांनी सत्ताबदलानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते.

बातम्या आणखी आहेत...