आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार:काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; सोनियांना म्हणाले -राहुल गांधींना उपाध्यक्ष केल्यामुळे काँग्रेस बरबाद

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्षाची सर्वच पदे व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला. आता ते आपला नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

आझाद आपल्या राजीनाम्यात म्हणाले - 'दुर्दैवाने पक्षात जेव्हा राहुल गांधी यांची एंट्री झाली व जानेवारी 2013 मध्ये जेव्हा तुम्ही त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली, तेव्हापासून त्यांनी पक्षाच्या सल्लागार व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकली.'

आझाद एवढ्यावरच थांबले नाही, ते पुढे म्हणाले - 'राहुल यांच्या प्रवेशानंतर पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना साइडलाइन करण्यात आले. पक्षात बिगरअनुभवी हुजरेगिरी करणाऱ्या लोकांचा एक नवा समुह तयार झाला. त्यानंतर हेच लोक पक्ष चालवू लागले.'

आझाद यांनी आपल्या राजीनाम्यात 5 पात्र व 4 स्थितींचा उल्लेख केला आहे. सर्वात कठोर प्रहार त्यांनी राहुल गांधींवर केला आहे. आझाद यांनी पक्षाच्या लयास गेलेल्या गतवैभवासाठी राहुल यांना जबाबदार धरले आहे. पाहुया ते आझाद कुणाविषयी नेमके काय म्हणाले...

सोनियांविषयी - निश्चितच काँग्रेस अध्यक्ष म्हणून तुम्ही यूपीए-1 व यूपीए-2 च्या स्थापनेत तुम्ही शानदार काम केले. या यशाचे सर्वात मोठे कारण हे होते की, तुम्ही अध्यक्ष म्हणून बुद्धिमान सल्लागार व ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयांवर विश्वास दाखवला. त्यांना ताकद दिली. त्यांची काळजी घेतली.

राहुलविषयी - त्यानंतर दुर्दैवाने राजकारणात राहुल गांधींचा प्रवेश झाला. विशेषतः तुम्ही जानेवारी 2013 मध्ये त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पक्षाची सल्लागार यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त केली. सर्वच ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना साइडलाइन केले. यामुळे पक्षात अननुभवी लोकांचा नवा गट तयार झाला. त्यानंतर हाच गट पक्ष चालवू लागला.

स्वतःविषयी - मी सलग 4 दशके काँग्रेसच्या कार्यकारी समितीचा सदस्य राहिलो. 35 वर्षांपर्यंत देशाचे जवळपास सर्वच राज्य व केंद्रशासित प्रदेशांत पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम केले. या कालावधीत मी ज्या राज्याचा प्रभारी राहिलो, त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक राज्यांत काँग्रेसला विजय मिळाला.

या महान संस्थेत माझे योगदान दिसावे म्हणून मी हे सर्वकाही सांगत आहे. राज्यसभेत मी विरोधी पक्षनेता म्हणून 7 वर्षे काम केले. मी माझी प्रकृती व आपले कुटुंबीय पणाला लावून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण काँग्रेसच्या सेवेत समर्पित केला.

पक्षाविषयी - सध्या सर्वात वाईट गोष्ट ही आहे की, यूपीए सरकारचे अखंडत्व नष्ट करणारी रिमोट कंट्रोल व्यवस्था काँग्रेसमध्ये लागू होत आहे. तुम्ही केवळ नामधारी अध्यक्षा आहात. सर्वच मोठे निर्णय राहुल गांधी घेत आहेत. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांचे सुरक्षा रक्षक व पीए हे निर्णय घेत आहेत.

आताच्या स्थितीवर हे भाष्य केले

1-काँग्रेसचा पराभव: राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर सरकारचा अध्यादेश फाडून टाकणे हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. काँग्रेसच्या कोर ग्रुपने हा अध्यादेश तयार केला होता. कॅबिनेट व राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती. पण या बालिश कृत्यामुळे भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपतींचे औचित्य संपुष्टात आले. 2014 मध्ये यूपीए सरकारच्या पराभवामागील हे सर्वात मोठे कारण होते. यामुळे राइट विंग व उद्योगपती फायद्यांची एक आघाडी झाली. त्याने एक अपप्रचार चालवला.

2- 2014 ते 2022 चा कालावधी: 2014 च्या तुमच्या व त्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात पक्षाला लज्जास्पद पद्धतीने 2 लोकसभा निवडणुकांत पराभव पत्करावा लागला. 2014 ते 2022 दरम्यान झालेल्या 49 विधानसभा निवडणुकांपैकी 39 निवडणुकांत आपला पराभव झाला. पक्षाने केवळ 4 राज्यांत निवडणूक जिंकली. 6 वेळा त्याला आघाडीत सहभागी व्हावे लागले. सध्या काँग्रेस केवळ 2 राज्यांत सत्तेत आहे. तर 2 राज्यांत त्याचा केवळ नाममात्र सत्तेत वाटा आहे.

3 - सोनियांना पुन्हा सांभाळावी लागली जबाबदारी: पराभवानंतर राहुल गांधी यांनी संतापाने अध्यक्षपद सोडले. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस कार्यसमितीच्या प्रत्येक ज्येष्ठ नेत्याचा अवमान केला. या नेत्यांनी पक्षाला आपले आयुष्य वाहिले होते. तेव्हा तुम्ही अंतरिम अध्यक्षा होत्या. मागील 3 वर्षांपासून तुम्ही ही जबाबदारी सांभाळत आहात.

4- काँग्रेसची विद्यमान स्थिती : सध्याही वाईट गोष्ट ही आहे की यूपीए सरकारचे अखंडत्व नष्ट करणारी रिमोट कंट्रोल व्यवस्था काँग्रेसमध्ये लागू होत आहे. तुम्ही केवळ नामधारी अध्यक्षा आहात. सर्वच मोठे निर्णय राहुल गांधी घेत आहेत. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांचे सुरक्षा रक्षक व पीए हे निर्णय घेत आहेत.

2 तासांतच प्रचार समितीचे अध्यक्षपद सोडले

आझाद अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयांवर नाराज होते. काँग्रेसने गत 16 तारखेला त्यांची जम्मू काश्मीरमधील पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पण आझाद यांनी अवघ्या 2 तासांतच त्याचा राजीनामा दिला होता. त्यावेळी आझाद यांनी हे आपले डिमोशन असल्याचे म्हटले होते.

73 वर्षीय आझाद यांची आपल्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची इच्छा होती. पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याऐवजी 47 वर्षीय विकार रसूल वाणी यांच्याकडे या पदाची जबाबदारी सपवली. वाणी हे आझाद यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. आझाद यांना हा निर्णय आवडला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्व सातत्याने आझाद यांच्या विश्वासू नेत्यांना त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेही आझाद नाराज होते.

काँग्रेस हायकमांडशी यापूर्वीही बेबनाव, पण तोडगा निघाला होता

गुलाम नबी आझाद 10 जनपथ म्हणजे सोनिया गांधी यांच्या गुडलिस्टमधून बाहेर पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2008 मध्ये जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावरून दूर झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडशी त्यांचा बेबनाव निर्माण झाला होता. पण 2009 मध्ये आंध्र प्रदेश काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर हायकमांडनी त्यांना त्यावर तोडगा काढण्यासाठी आंध्रात पाठवले. त्यानंतर ते पुन्हा गुड लिस्टमध्ये समाविष्ट झाले. त्यानंतर ते केंद्रात मंत्रीही झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी काँग्रेस नेतृत्वासोबत तडजोड झाली नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देणे पसंत केले.

जी-23 ग्रुपचे सक्रिय सदस्य

गुलाम नबी आझाद पक्षाच्या बंडखोर जी-23 समुहाचे सक्रिय सदस्य होते. या गटाने पक्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत अमुलाग्र सुधारणांची मागणी केली होती. या गटाच्या कारवायांमुळे आझाद यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेषतः केंद्राने यंदाच त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केल्यामुळे त्यांची केंद्रातील सत्ताधारी भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. या सर्वांची परिणिती आझाद यांच्या आजच्या राजीनाम्यात झाली आहे.

आझादांना राज्यसभेत निरोप देताना भावूक झाले होते पीएम मोदी

गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निरोपावेळी पीएम नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख आपले मित्र म्हणून केला होता.
गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निरोपावेळी पीएम नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख आपले मित्र म्हणून केला होता.

आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2021 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर त्यांना एखाद्या दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर पाठवले जाईल, असा त्यांना वाटत होते. पण काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले नाही. आझाद यांच्या राज्यसभेतील निरोपावेळी पीएम मोदी चांगलेच भावूक झाले. 2021 मध्ये मोदी सरकारने त्यांचा पद्भूषण देऊन सन्मान केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हे आवडले नाही. आझादांनी हा सन्मान नाकारला असता तर बरे झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...