आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa Corona News And Updates, In Goa, 103 Patients Died In 3 Days Due To Lack Of Oxygen

मृत्यूचे तांडव:गोवा राज्यात ऑक्सिजनअभावी 3 दिवसांत 103 रुग्णांचा मृत्यू

पणजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हायकोर्टाचे सरकारला आदेश एकही रुग्ण दगावता कामा नये
  • गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची उच्च न्यायालयात कबुली

गोवा राज्यातील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले असल्याची कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उच्च न्यायालयासमोर दिली आहे. यानंतर यापुढे ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये, असा आदेश न्या. महेश सोनक आणि न्या. नितीन सांब्रे या द्विसदस्यीस न्यायपीठाने दिला आहे. ही सुनावणी बुधवारी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. दरम्यान, गेल्या महिनाभरात ऑक्सिजनअभावी १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या सुनावणीला राज्याचे आरोग्य सचिव रवी धवन, प्रिन्सिपल वित्त सचिव पुनीतकुमार गोयल, नगरविकास सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा मेडिकल कॉलेजचे नोडल ऑफिसर डॉ. विराज खांडेपारकर उपस्थित होते. डीन डॉ. शिवानंद बांदेकर अनुपस्थित असल्याचे आढळताच न्यायालयाने चौकशी केली आणि तत्काळ त्यांच्या उपस्थितीचा आदेश दिला. सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यासोबत अतिरिक्त सरकारी वकील दीप शिरोडकर उपस्थित होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मेसर्स स्कूप इंडस्ट्रीज प्रा. लि. या आस्थापनांच्या वतीने अॅड. विवेक रॉड्रिग्ज तर केंद्र सरकारच्या वतीने सहायक सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई आणि रविराज चोडणकर उपस्थित होते.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा नाही : मुंबई उच्च न्यायालयासमोर कोविडसंदर्भात कोविड सर्व्हिसिंग गोवा या संस्थेच्या वतीने दिशा नायक सरदेसाई व सिद्धार्थ सरदेसाई यांनी याचिका सादर केली. संपूर्ण गोव्यातील रुग्णालयांसाठी रोज सुमारे ५५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा लागतो. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सर्वात अधिक मागणी आहे, पण तेवढा पुरवठा होत नाही याची कबुली डॉक्टर आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी न्यायपीठापुढे दिली. सुपरस्पेशालिटी ब्लॉकसाठी २० हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा करणारी टाकी आहे. पण त्यातून गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करता येत नाही. गोमेकॉसाठी दिवसाला ७२ ट्रॉली ऑक्सिजन सिलिंडर लागतात. पण तेवढा पुरवठा होत नसल्याने १.५ क्युबिक मीटर व ७ क्युबिक मीटरचे सिलिंडर वापरले जातात. पण हा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची माहिती उच्च न्यायालयासमोर उघड करण्यात आली. त्यामुळे आता गोवा सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

असे झाले १०३ रुग्णांचे मृत्यू

  • ३३ मृत्यू - दि. ९ मे ५०० जम्बो सिलिंडर कमी
  • २५ मृत्यू-दि. १० मे रोजी ७०० सिलिंडर कमी
  • ४५ मृत्यू-११ मे रोजी ९०० सिलिंडर कमी

दररोज ४०० सिलिंडरचा तुटवडा

जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत व ज्यांना व्हेंटिलेटर मिळाले नाहीत, त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्सिजन एचएफएनओ उपकरणाद्वारे दिला जाऊ शकतो. अशी शेकडो यंत्रे गोमेकॉत पडून आहेत. या यंत्रांना खूप ऑक्सिजन लागते म्हणून त्याचा वापर केला जात नाही, अशी कबुली गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यावर रोज ५० पेक्षा रुग्ण का मरण पावतात हे स्पष्ट झाले. रोज गोमेकॉत १ हजारपेक्षा जास्त सिलिंडर लागत असले तरी किमान ४०० सिलिंडरचा तुटवडा भासतो, अशी माहिती उघड होताच रिकामे सिलिंडर नसल्यामुळे व सिलिंडर नेण्यासाठी वाहने नसल्यामुळे अडथळा होतो, असे स्पष्ट करण्यात आले. या वेळी एनजीओमार्फत गावाबाहेरून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची तयारी दर्शवली.

बातम्या आणखी आहेत...