आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराच्या किनाऱ्यावरून भारत-चिनी सैनिकांची माघार घेण्यासंबंधी झालेल्या कराराबाबत शुक्रवारी शंका उपस्थित केली. विद्यमान भारत सरकारने चीनसमोर नांगी टाकली असल्याचा आरोप राहुल यांनी केला. भारताच्या हक्काच्या भूभागावर सरकारने पाणी सोडले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राहुल यांचे हे वक्तव्य म्हणजे लष्कराचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला.
राजस्थानात किसान महापंचायतीत राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा पवित्र भूभाग चीनच्या ताब्यात दिला. चीनसमोर नांगी टाकून ते शेतकऱ्यांना मात्र मारतील. दरम्यान, राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया देताना हा भारतीय लष्कराचा अपमान असल्याचे सांगितले. काँग्रेसची ही नवी सर्कस आहे. लष्कराच्या माघारीबाबत झालेला करार चुकीचा ठरवण्यासाठी काँग्रेस एवढी आतुर का आहे? चीन आणि काँग्रेसदरम्यान काही करार झाला आहे का? असे ते म्हणाले. राहुल यांच्या आरोपांनंतर संरक्षण मंत्रालयानेही खुलासा केला. यात थेट राहुल यांचा उल्लेख नसला तरी त्यांचे दावे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पूर्व लडाख सीमेवर बलिदान देऊन यश मिळवणाऱ्या सैनिकांवरच शंका उपस्थित करणे हा लष्कराचा अपमान आहे. या करारात भारताने आपला भूभाग गमावलेला नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयानेही केला खुलासा
राहुल यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला. राहुल यांनी भारतीय भूभाग पेंगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर-४ पर्यंत असल्याचे जे सांगितले ते पूर्णत: चुकीचे आहे. भारताच्या दृष्टीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) फिंगर-८ वर आहे. त्यामुळे फिंगर-८ पर्यंत गस्त घालण्याचा हक्क भारत सांगतो आहे. चीनशी झालेल्या चर्चेतही हाच मुद्दा लावून धरला. भारताच्या नकाशात १९६२ मध्ये चीनने अवैधरीत्या ताब्यात घेतलेला ४३ हजार चौरस किमी भूभागही दाखवण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.
संरक्षणमंत्र्यांचा दावा : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यानुसार, भारताचे सैनिक फिंगर-३ च्या जवळ असलेल्या पोस्टपर्यंत मागे येतील, तर चीनचे सैनिक फिंगर-८च्या पूर्वेपर्यंत मागे जातील. फिंगर-३ व फिंगर-८च्या मध्ये असलेला भूभाग सध्या मोकळा राहील. दोन्ही बाजूंचे सैनिक या भागांत जाणार नाहीत किंवा गस्तही घालणार नाहीत. याच प्रकारे पेंगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून सैनिक मागे येतील.
सद्य:स्थिती कायम राखून भारताचा सन्मान वाढवला...
भारत-चीनदरम्यान सीमेवर सुरू असलेल्या तणावावरून भारतीय राजकारण सतत तापत आहे. एकीकडे काँग्रेसने यावर टीका करताना सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर चीनच्या कारवायांना तोंड देताना भारताचे पारडे नेहमीच जड राहिल्याचा दावा केंद्राने केला आहे. चीनशी केलेल्या करारात सद्य:स्थिती राखून भारताचा सन्मान वाढवल्याचेही केंद्राचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.