आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात अखेर दिशा रवीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या 9 दिवसांपासून कारागृहात राहिलेल्या दिशाला दिल्लीच्या पतियाळा येथील हाउसकोर्टाकडून एक लाखाच्या खासगी जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याच प्रकरणातील आणखी एक सह-आरोपी शांतनू मुलुकने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कोर्टाने पुरावे मागितले होते
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार आणि टूलकिटचा संबंध काय अशी विचारणा करताना पोलिसांना पुरावे मागितले होते. त्यावर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. भारताला जागतिक पातळीवर बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रात दिशाचा हात आहे. तिने शेतकरी आंदोलनांच्या आडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असा दावा सुद्धा पोलिसांनी कोर्टात केला होता. एवढेच नव्हे, तर दिशा टूलकिट प्रकरणाव्यतिरिक्त खलिस्थानी वकिलांच्या संपर्कात होती. खलिस्थानी संघटनेंना दिशाचा वापर केला असे पोलिसांनी आरोप केले. पण, दिशाच्या वकिलांनी ते स्पष्टपणे फेटाळून लावले.
दिशाला टूलकिट प्रकरणात यापूर्वीच पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पोलिसांनी तिच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करावी अशी मागणी केली होती. पण, महानगर न्यायाधीशांनी तिच्या रिमांडमध्ये एका दिवसाची वाढ केली. त्यामुळे, पोलिसांनी आज दिशा आणि निकितासह मुकुल यांची समोरासमोर चौकशी केली. दिशाने आपल्यावर लागलेले सर्व आरोप शांतनु आणि निकितावर ढकलले त्यामुळे त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असे पोलिसांनी कोर्टाला सांगितले आहे.
दिशाला दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. दिल्ली पोलिसांचा आरोप होता, की फ्राइडे फॉर फ्यूचर मोहिमेची सुरुवात करणारी दिशा हिनेच टूलकिट बनवून ते पसरवले होते. तिने यासाठी सोशल मीडिया ग्रुप सुद्धा बनवले होते. हीच टूलकिट पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियावर शेअर केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.