आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ground Report: Corruption In Jammu And Kashmir Will Be Best Seller Book Chief Secretary Subramaniam

370 नंतरचे 365 दिवस:ग्राउंड रिपोर्ट : जम्मू-काश्मीरच्या भ्रष्टाचारावर लिहिल्यास पुस्तक बेस्ट सेलर - मुख्य सचिव सुब्रमण्यम

पवन कुमार । श्रीनगर3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये दोन दिवसांच्या बंदनंतर रस्त्यावर वाहतूक दिसली. - Divya Marathi
श्रीनगरमध्ये दोन दिवसांच्या बंदनंतर रस्त्यावर वाहतूक दिसली.
  • दहशतवादी बनलेल्यांचे जीवन 90 दिवसांचे : महासंचालक

जम्मू-काश्मीरमधील भ्रष्टाचार व येथील पद्धतींवर लिहिण्याचे ठरवल्यास एखादे पुस्तक तयार होईल. तेही बेस्ट सेलर. राज्यात कोणत्याही नियमांचे पालन होत नव्हते. कोणती प्रक्रिया पाळली जात नव्हती. परंतु एवढी घाण कोठेही पाहिली नाही, असे राज्याचे मुख्य सचिव बी.व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

येथील सरकारांनी आपल्या लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी भ्रष्ट पद्धतीने कामे केली. सरकारी पैसे मोजक्या कुटुंबांपुरते मर्यादित ठेवण्यात आले. नेते, नोकरशहा, बिझनेस क्लास, बँकर्स यांनी मिळून राज्याचे हाल केले. अशा प्रकारे नियम-कायदे भ्रष्टाचाराच्या दृष्टीने तयार करण्यात आले. सरकार बदलल्यास कामे खोळंबतात. कारण नवे सरकार आपल्या लोकांची कामे करण्यास प्राधान्य देते. ५ ते १० वर्षांपासून सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अडकून पडले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भविष्यातील रिक्त पदांची आधीच भरतीदेखील करण्याचे प्रयोग झाले. गुणवत्ताही बघण्यात आली नाही. पारदर्शकतेचा प्रश्नच नाही. त्यामुळे पात्र मुले सरकारी नोकरीपासून वंचित राहतात. शारीरिक शिक्षण क्षेत्रात २७०० शिक्षकांना विनापरीक्षा भविष्यातील रिक्त पदांच्या आधारे करारावर घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांवर दगड मारणाऱ्या मुलांचा काही दोष नाही. त्यांनी ना पाकिस्तान पाहिला ना भारत. त्यांच्यासाठी काहीही करण्यात आलेले नाही. जम्मू-काश्मीर बँकेला तर सुनियोजितपणे लुटण्यात आले. एखाद्या उद्योजकाने प्रकल्पाचा प्रस्ताव आणल्यास त्याला मागणीपेक्षा जास्त कर्ज देण्यात आल्याची प्रकरणे आहेत. दोन ते तीन वर्षांत कंपनी तोट्यात जाते. नंतर कर्जाची रक्कम एनपीए म्हणून जाहीर केली जाते. बँकेला नुकसान झाल्यास कॅपिटल अमाउंट सरकारकडून बँकेला देण्यात आली. माझी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यावर देशाच्या सर्वोच्च नेत्याने येथील घाण साफ करण्यास सांगितले होते. आता लवकरच ३५ हजार सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. आगामी काही वर्षांत ४ ते ५ लाख नोकऱ्या खासगी क्षेत्रात तयार केल्या जातील, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

दहशतवादी बनलेल्यांचे जीवन ९० दिवसांचे : महासंचालक

जम्मू-कश्मीर खोऱ्यातील तरुण दहशतवादी होण्यासाठी जातात. तेव्हा त्यांचे जीवन साधारण ९० दिवसांचे असते. सुरक्षा दलाने लक्ष्य स्पष्ट केले आहे. या कालावधीत त्यांनी एक तर घरी परतावे किंवा शरणागती घ्यावी, अन्यथा त्यांना चकमकीत ठार केले जाईल. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग म्हणाले, दहशतवादाच्या मार्गावर जाणारी १६ मुले परतली आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहे. अलीकडेच ८० दहशतवादी बनले आहेत. त्यापैकी ३८ जणांना ठार करण्यात आले. २२ जणांना पकडले. २० दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत. ते निशाण्यावर आहेत. यंदा आतापर्यंत १५० जणांना ठार केले आहे. त्यात १३० स्थानिक व २० परदेशी दहशतवादी होते.