आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ:देशातील पहिल्या मशिदीतून ग्राउंड रिपोर्ट; एलडीएफचा बालेकिल्ला, पण लोकांच्या तोंडी भाजपही

त्रिशूर / गौरव पांडेयएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील चेरामन जुमा मशीद देशातील पहिली मशीद आहे. त्रिशूरपासून ४० किमी व कोचीहून सुमारे ३५ किमी अंतरावर कोडंगलूर विधानसभा मतदारसंघातील मेथला गावात ही मशीद आहे. तसे येथे आता गावासारखे काहीही दिसत नाही. मशीद इसवी सन ६२९ मध्ये बांधली होती. सध्या मशिदीची वारसा कल्याण प्रकल्पांतर्गत डागडुजी केली जात आहे. मशिदीच्या समितीत प्रशासनातील फैजल म्हणाले, या कामासाठी विजयन सरकारने १.१८ कोटी रुपये दिले. त्याशिवाय सुमारे १५ कोटी रुपये आम्हाला लोकांनी दिले. कोडंगलूर जागा नेहमीच भाकपचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१६ मध्ये भाकपचे व्ही.आर. सुनीलकुमार आमदारपदी विजयी झाले होते.

८ वेळा सीपीआयचे उमेदवार विजयी : फैजल म्हणाले, येथे कुणाचीही अडचण नाही. येथे आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष आहोत. येथे प्रत्येक धर्मातील लोकांत बंधुभाव व एकता दिसते. चेरामन मशीद धर्मनिरपेक्ष विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. येथील बहुतांश लोक एलडीएफचे समर्थक आहेत. परंतु गेल्या वेळी स्थानिक पंचायत निवडणुकीत भाजपने येथे चांगले काम केले. कोडंगलूर नगरपालिकेत एकूण ४४ जागा आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी डिसेंबरमधील निवडणुकीत भाजपने २१, एलडीएफने २२ व काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला. त्यावरून येथील भाजपच्या मजबूत स्थितीचा अंदाज बांधता येतो.मशिदीकडून कोडंगलूर बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा भाजप व एलडीएफ यांच्यात बॅनर व पोस्टरची स्पर्धा लागल्यासारखे वाटते. बाजाराच्या आधी देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य द्वाराच्या बाहेर भाजपचे पोस्ट डकवलेले दिसले.

मंदिर परिसरात काही दुकाने आहेत. त्यातच भाजपचे कार्यालय दिसले. मोहनदास यांचे येथे २० वर्षे जुने दुकान आहे. एलडीएफ सरकार कसे आहे? त्यावर मोहनदास म्हणाले, खूप चांगली कामे होत आहेत. आम्हाला रेशन किट मिळते. निवृत्तिवेतन मिळते. आणखी काय हवे? येथील हरी म्हणाले, भाजप चांगली कामगिरी करून दाखवू शकते. आमच्या वाॅर्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होेते. त्रिशूरच्या लोकांमध्ये आणखी एक गोष्ट चर्चिली जाते. राज्यात नवीन सरकार कुणाचे असेल, हे त्रिशूरमधील लोक आधीच सांगून टाकतात. राजगोपालन म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेत कोण निवडून येणार आणि कुणाचे सरकार सत्तेवर येईल, हे स्पष्ट होते. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे उमेदवार टी.एन. पार्थापन जिंकले होते. म्हणूनच राज्यात यूडीएफचे सरकार बनू शकते. २०१४ मध्ये भाकपचे उमेदवार जिंकले होते. राज्यातही २०१६ मध्ये एलडीएफ सरकार स्थापन झाले होते. २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. २०११ मध्ये यूडीएचे सरकार स्थापन झाले होते.

राज्यात २६ टक्के मुस्लिम, २४ ते ३० जागांवर मुस्लिम लीग लढू शकते
कोडंगलूर भागात सुमारे ३० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. मुस्लिम समुदायाची विजय-पराभव यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. सेंटर फॉर पब्लिक रिसर्च (सीपीपीआर)चे अध्यक्ष डॉ. धनुराज म्हणाले, तसे पाहिल्यास राज्यात मुस्लिम मतदारांचे प्रमाण सुमारे २६ टक्के आहे. त्यावरून सुमारे ५० ते ५५ जागांवर मुस्लिम निर्णायक भूमिकेत आहेत. त्यापैकी २४ ते ३० जागांवर मुस्लिम लीगचे उमेदवार रिंगणात असू शकतात. गेल्या वेळी मुस्लिम लीगचे १८ उमेदवार विजयी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...