आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो रिपीट फॉर्म्युला:रूपाणींचे सर्व मंत्री बाहेर, केंद्रीय मंत्र्यांचे संकेत : इतर राज्यांतही हाच कित्ता शक्य

गांधीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातेत 24 नव्या मंत्र्यांचा शपथविधी, पैकी 21 पहिल्यांदाच मंत्री

गुजरातेत पहिल्यांदा आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापनेतही नवा प्रयोग केला आहे. भाजपने विजय रूपाणींच्या २२ मंत्र्यांच्या संपूर्ण टीमला नारळ देत नव्या सरकारमध्ये सर्व नव्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. गुरुवारी २४ मंत्र्यांचा शपथविधी झाला. पैकी १० कॅबिनेट व १४ राज्यमंत्री आहेत. २४ पैकी २१ आमदार पहिल्यांदा मंत्री बनले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री व गुजरात प्रभारी भूपेंद्र यादव यांनी संकेत दिले की, पक्ष हा प्रयोग इतर राज्यांतही आजमावू शकतो. त्यांना विचारण्यात आले की, गुजरातचा संपूर्ण कॅबिनेट बदलण्याचा फॉर्म्युला इतर राज्यांतही वापरला जाऊ शकतो का? त्यावर ते म्हणाले, ‘अवघ्या देशात हा अभिनव प्रयोग आहे. गुजरात प्रयोगशाळा नव्हे, प्रेरणा आहे.’

कॅबिनेटचे विश्लेषण : १२ मंत्री शालेय शिक्षणानंतर शिकले नाहीत, पैकी ३ आठवी आणि १ चौथी पास, महिला मंत्री दोनच
- गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअर आहेत.
- २४ मंत्र्यांपैकी तीन बारावी पास आहेत. ५ दहावी उत्तीर्ण आहेत. ३ मंत्री आठवी, एक मंत्री चौथीच्या पुढे शिकलेले नाहीत.
- दोन मंत्री अंडर ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर आहेत. ९ मंत्री पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत.
- केवळ एक मंत्री पीएचडीधारक आहे.
- कॅबिनेटमध्ये ७-७ मंत्री पटेल (मुख्यमंत्र्यांसह) आणि ओबीसी (३ कोळी जातीचे) समुदायातील आहेत.
- एससी, क्षत्रिय आणि ब्राह्मण समाजातून प्रत्येकी दोन-दोन मंत्री आहेत.
- आदिवासी समुदायातून ४ मंत्री आणि जैन समुदायातून एक मंत्री आहे.
- महिला मंत्र्यांची संख्या दोन आहे. रूपाणी कॅबिनेटमध्ये एकच महिला हाेती.

काँग्रेस पक्षामधून आलेल्या आमदारांपैकी तिघांना मंत्रिपद
‘नो रिपीट फॉर्म्युल्या’मुळे भाजपमध्ये असंतोष वाढल्यामुळे बुधवारी शपथविधी सोहळा लांबणीवर टाकावा लागला होता. तथापि, गुरुवारी पक्ष त्यावर ठाम राहिला. दुसरीकडे, काँग्रेस सोडून आलेल्या आमदारांपैकी जीतू चौधरी, राघव पटेल आणि ब्रिजेश मेर्जा यांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली आहे.

पालिकांत आजमावला फॉर्म्युला, आता राज्य सरकारमध्येही लागू
भाजपने ‘नो रिपीटेशन’ फॉर्म्युला सर्वात आधी गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत आजमावला होता. तो यशस्वीही ठरला होता. याच फॉर्म्युल्याच्या अंतर्गत विजय रूपाणींच्या संपूर्ण कॅबिनेटमधील एकाही मंत्र्याचा नव्या सरकारमध्ये समावेश केलेला नाही. हा फॉर्म्युला आगामी विधानसभा निवडणुकीतही प्रभावी असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केजरीवाल सरकारमध्ये असेच चित्र होते : दिल्लीत पहिल्यांदाच आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवालांसह संपूर्ण कॅबिनेट नवी होती. कॅबिनेटमधील ६ मंत्री पहिल्यांदाच आमदार व मंत्री बनले होते.

बातम्या आणखी आहेत...