आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat High Court Orders Probe Into Jalgaon Corona Test Certificate | Marathi News

बनावट प्रमाणपत्र:जळगावातील कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय, गुजरात उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील जळगावात कोरोना चाचणीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करत एका कैद्याने सादर केलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचा आदेश गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयाने दिला. पोलिस उपअधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी करण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोरोना चाचणीचे बनावट प्रमाणपत्र विकत दिले जातात हे सिद्ध करणारे वृत्त गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या जळगाव आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे. त्या वृत्ताला दुजोरा देणारी घटना त्याच दिवशी अहमदाबादमध्ये गुजरात उच्च न्यायालयात घडली. न्यायमूर्ती सोनिया गोकाणी आणि न्यायमूर्ती मोना भट्ट यांच्या पीठासनासमोर एका खुनाच्या कैद्याच्या जामिनाबाबत सुनावणी सुरू होती. १० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याला १२ आॅक्टोबर रोजी आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्या जामिनाची मुदत संपल्यानंतर तो आरोपी तुरुंगात हजर होण्याऐवजी जामिनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात आला. मात्र, न्यायालयाने त्याला मुदतवाढ द्यायला नकार दिला. त्यानंतर आरोपी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सांगत त्याच्या वकिलाने जळगाव येथून मिळालेले कोरोना संक्रमित असल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले.

बनावट प्रमाणपत्र देणारी साखळी असावी : हायकाेर्ट
या प्रकरणात निर्णय देताना उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर अशी टिप्पणी केली आहे. न्यायमूर्तींनी म्हटले आहे की, सुरत तुरुंगातील कैद्याने महाराष्ट्रातील जळगावातून कोरोना संक्रमित असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे यात एखादे व्यवस्थित नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय येतो आहे. अशा नेटवर्कला पकडण्यासाठी डीवायएसपीपेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याकडून तपास केला जाणे आवश्यक आहे. असे नेटवर्क वेळीच पकडले जाणे आवश्यक आहे, ज्यामुळे बनावट अहवालांच्या आधारे होणारे इतर गुन्हे ताबडतोब रोखले जाऊ शकतील. या तपासाचा अहवाल २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर केला जावा.

सरकारी वकिलांकडून हरकत
आरोपी सुनील ऊर्फ पहिलवान पाटील हा सुरत येथील खुनाच्या प्रकरणात तिथल्याच तुरुंगात १० वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याने महाराष्ट्रातील जळगाव येथून कोरोना संक्रमित असल्याचे प्रमाणपत्र आणले हेच प्रथमदर्शनी संशयास्पद असून हे प्रमाणपत्रच बनावट असण्याची शक्यता आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी जामिनाला मुदतवाढ देण्यास जोरदार हरकत घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पीठानेही ती बाब गांभीर्याने घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...