आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' डॉनला दाऊद इब्राहिमही घाबरत होता:गरिबीत वाढला, तुरुंगातून निवडणूकही जिंकला; वाचा गुजरातच्या डॉनची थरारक कहाणी

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेविश्वातून राजकारणाच्या आखाड्यात येणारे नेते केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्येच नाहीत. गुजरातच्याही अनेक नेत्यांनी गुन्हेजगतातून येऊन राजकारणाच्या पांढरपेशा जगात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातील एक नाव आहे अब्दुल लतीफ. या अब्दुलचे नाव भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतही होते. त्याचा धाक एवढा होता की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमही त्याला डोकेदुखी समजत होता.

गुजरातच्या डॉनची कहाणी

गुजराती डॉन अब्दुल लतीफचा जन्म अहमदाादच्या दरियापूर भागात झाला. अत्यंत गरीब कुटुंबाशी संबंध असणाऱ्या अब्दुल लतीफचे बालपण जेमतेम गेले. 8 भावंड व कमावणारे वडील एकटे. खर्च जास्त अन् उत्पन्न कमी. यामुळे त्याच्या घरात नेहमीच आर्थिक चणचण असायची. पण त्यानंतरही वडिलांनी अब्दुल लतीफला शिकवण्याचा प्रयत्न केला. पण कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे त्याने 12वीनंतर शाळा सोडली.

अवैध दारु विक्रीपासून सुरुवात

घरातील गरीबी पाहून अब्दुल लतीफने ती दूर करण्याचा चंग बांधला. काहीही झाले तरी यापुढे गरिबीत राहायचे नाही, असा निर्धार त्याने केला. त्यानंतर सुरू झाली चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याची मालिका. 70 च्या दशकाच्या सुरुवातीला अब्दुल लतीफने गुन्हे जगतात पाय ठेवला. प्रारंभी अवैध दारु विक्रीचा धंदा सुरू केला. 80 च्या दशकात गुजरातमद्ये देशी दारुच्या व्यवसायाला चांगले दिवस आले होते. त्यामुळे अब्दुलनेही त्यात उडी मारली.

दाऊद इब्राहिमसाठी ठरला अडचण

अब्दुल लतीफने राजस्तानच्या उदयपूरमधीलही अनेक दारु भट्ट्यांत पैसा लावला. त्याची आपले काळे धंदे दुसऱ्या राज्यांतही पसरवण्याची इच्छा होती. झालेही तसेच. या काळ्या धंद्यातून अब्दुल लतीफने अमाप पैसा कमावला. पण त्याच्या गुन्हेजगतातील हा केवळ चंचूप्रवेश होता. गुजरातच्या माफिया डॉन उदयास येण्याची ही सुरुवात होती. ही सुरुवात होती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी डोकेदुखी ठरण्याची.

शस्त्रास्त्र तस्करीशी संबंध

थोड्याच वेळात अवैध दारु विक्रीच्या धंद्यात अब्दुलचे नाव सर्वात वर पोहोचले. या धंद्यात अमाप पैसा कमावल्यानतंर अब्दुल लतीफ गुन्हेगारीच्या दलदलीत फसतच गेला. त्याचा पुढला मुक्काम होता शस्त्रास्त्र तस्करी. दारुच्या धंद्यात आपले नाव कमावल्यानंतर अब्दुलची अनेक मोठ्या गुन्हेगारांसोबत उठबस सुरू झाली. त्याचा फायदा त्याला शस्त्रास्त्र तस्करीत झाला. 80 च्या दशकात गुजरातच्या गुन्हे जगतात त्याचे मोठे नाव झाले होते. खून, अपहरण, खंडणी सारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर झाली होती.

तुरुंगातून जिंकली निवडणूक

उर्वरित सर्वच डॉन माफियांसारखे अब्दुल लतीफही एका वर्गासाठी देव माणूस ठरला. लहानपणी गरिबी पाहिल्यामुळे लतीफ नेहमीच गरजवंतांना मदत करत होता. मुलींचे लग्न करवून देणे, लोकांचे कर्ज फेडणे, गरिबांना शिक्षणासाठी पैसे देणे आदी सर्व कामांत तो अग्रेसर राहत होता. अहमदाबादमध्येही लतीफच्या चाहत्यांची कमी नव्हती. यामुळेच त्याने तुरुंगातून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 1986-87 मध्ये गुजरात नगरपालिका निवडणुकीच्या 5 जागांवर त्याने आपले उमेदवार उभे केले. कालूपूर, दरियापूर जमालपूर व राखंडा नगरपालिका मतदार संघावर आता माफिया डॉन अब्दुलचा कब्जा होता.

दाऊदशी घेतला पंगा

अब्दुल लतीफने राजकारणात आपले स्थान निर्माण केले. पण त्याचे मन एवढ्यानेच भरले नाही. 1990 च्या आसपास तो गुजरातमध्ये एवढा पॉवरफुल्ल झाला होता की, तो मुंबईत बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डोळ्यात खुपू लागला. त्याचे झाले असे की, अब्दुलने दाऊदच्या एका शत्रूला आश्रय दिला होता. गरीबीत जन्मलेला अब्दुल आता स्टायलिश आयुष्य जगत होता. हातात सिगारेट व पांढरी फिएट कार त्याची ओळख बनली होती. निवडणूक जिंकल्यामुळे त्याचा वचक वाढला होता. सुप्रीम कोर्टातून त्याला जामीनही मिळाला होता.

दाऊदने दुबईला बोलावले

दाऊद इब्राहिमलाही अब्दुल लतीफच्या ताकदीचा अंदाजा आला होता. असे सांगितले जाते की, दाऊनेही 90 च्या दशकाच्या सुरुवातीला अब्दुलशी मैत्री करण्याचा विचार केला. यासाठी त्याने त्याला दुबईला बोलावले. दोघांची दुबईतील चांगली भेट झाली. काही काळापूर्वीचे एकमेकांचे शत्र आता दोस्त झाले होते. पण त्यांची ही मैत्री मुंबईचाच आणखी एक क्रिमिनल शाहजादाच्या डोळ्यात खूपत होती. अब्दुल दुबईहून परतताच शाहजादा व त्याच्यातील शत्रूत्व वाढले. त्यांच्यातील गँगवॉरच्या बातम्या नेहमीच कानावर येत होत्या.

काँग्रेस नेत्याची हत्या घडवली

एकदा शाहजादा गुजरातचा एक मद्य व्यावसायिक हंसराजसोबत राधिका जिमखान्यात बसला होता. तेव्हा अब्दुल लतीफ गँगने तिथे गोळीबार केला. या घटनेत शाहजादासह 9 जणांचा मृत्यू झाला. गुजरात पोलिस आता अब्दुलच्या मागे लागली होती. तो पोलिसांपासून लपत फिरत होता. त्यावेळी काँग्रेस नेते रउफ वल्लीउल्लाह यांनी अब्दुलला कोणत्याही स्थितीत शिक्षा देण्याचा चंग बांधला होता. तो सर्वांपासून लपत फिरत होता. त्यावेळी दाऊदनेच त्याची मदत केली. स्वतःच्या सुरक्षेसाठी दुबईला पळून गेला. दुबईतच अब्दुलने काँग्रेस नेते रऊफ वल्लीउल्लाह यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर 1992 मध्ये अब्दुल्ला गँगच्या 2 शार्प शूटर्सनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

पाकिस्तानात मेमनशी झाली भेट

अब्दुलसाठी गुजरातमध्ये राहणे अवघड झाले होते. त्याच्यावर टाडा व रासुका सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्याने देश सोडून दुबईत राहणे सुरू केले. तेथून तो पाकिस्तानातही गेला. तिथे त्याची भेट टायगर मेमनशी जाली. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांत शस्त्रास्त्र पुरवठा करण्यात अब्दुलने दाऊदची मदत केल्याचेही सांगितले जाते. मुंबई हल्ल्यानंतर अब्दुलचा समावेश मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत झाला होता. तो पोलिसांपासून लपत फिरत होता. तो पाकिस्तानात पळाल्याच्या वावड्या उठल्या. पण अखेर 1995 मध्ये गुजरात एटीएसने अब्दुल लतीफच्या दिल्लीत मुसक्या आळल्या.

पोलिस चकमकीत झाला मृत्यू

अब्दुल लतीफला गुजरातच्या साबरमती तुरुंगात डांब्यात आले. तिथे तो 2 वर्षांपर्यंत राहिला. 29 नोव्हेंबर 1997 मध्ये त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. पोलिसांनी अब्दुल लतीफचा चकमकीत खात्मा केला. कधिकाळी गरीबांसाठी देवमाणूस ठरलेला, राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला गुजरातचा डॉन आपल्या अंतिम वेळी देशाचा सर्वात मोठा शत्रू ठरला होता. दाऊदला भेटल्यानंतर अब्दुल लतीफचे आयुष्य पूर्णतः बदलले होते. त्यामुळे त्याचा शेवटही त्याच्या काळ्या कृत्यासारखाच भयावह झाला.

बातम्या आणखी आहेत...