आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात प्रथमच संसर्गजन्य H3N2 इन्फ्लूएंझामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार सतर्क झाले आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील 82 वर्षीय व्यक्ती आणि हरियाणातील जिंद येथील 56 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना रक्तदाबासारखे आजार होते. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
जानेवारीपासून देशात H3N2 इन्फ्लूएंझाचे 3084 रुग्ण नोंदवले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर NITI आयोगाने शनिवारी मंत्रालयांची बैठक बोलावली आहे. यामध्ये राज्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच कोणत्या राज्याला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हेदेखील पाहिले जाईल. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, मार्चच्या अखेरीस H3N2 संसर्गाचे रुग्ण कमी होण्याची शक्यता आहे.
आरोग्यमंत्र्यांची शुक्रवारी आढावा बैठक
याआधी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान, त्यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार राज्यांसोबत काम करत असल्याची माहिती मांडविया यांनी दिली.
दिव्य मराठीच्या तज्ज्ञांचे मत...
अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ. राम शंकर उपाध्याय म्हणाले की, H3N2 इन्फ्लूएंझा हा हाँगकाँग व्हायरस म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे बाधित रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण केवळ 7 टक्के आहे, मात्र याबाबतीत हलगर्जीपणा योग्य नाही.
काय आहेत H3N2 विषाणूची लक्षणे?
हा इन्फ्लूएंझा विषाणू आहे ज्यामुळे श्वसन संक्रमण होते. WHOच्या मते, H3N2 हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. इन्फ्लूएंझा विषाणू हवेत वर्षभर राहत असला तरी हवामानातील चढउतारांमुळे त्याची तीव्रता वाढते. H3N2 संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, ताप, जुलाब, उलट्या आणि अंगदुखीच्या तक्रारीही आहेत.
का वाढला या विषाणूचा संसर्ग?
सध्या कोरोनानंतरचे युग आहे. आताही देशात कोरोनाचे तीन हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. H3N2 संसर्ग वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले- कोरोनामुळे लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आणि असंतुलित झाली आहे. दुसरे- H3N2 विषाणूचे उत्परिवर्तन झाले आहे म्हणजेच त्याचे स्वरूप बदलले आहे. व्हायरसमधील या बदलामुळे संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत.
H3N2 पासून कसे कराल संरक्षण?
कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हा प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग आहे. हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. दीर्घकाळ खोकला आणि सर्दीसाठी डॉक्टरांना भेटा. H3N2 इन्फ्लूएंझासाठी सध्या कोणतीही लस नाही. त्याच्या उपचारात अँटीव्हायरल औषधे वापरली जातात. IMA ने डॉक्टरांना H3N2 मध्ये अँटिबायोटिक्स न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
या विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला?
लहान मुले, वृद्ध आणि आधीच अस्तित्वात असलेले आजार असलेल्या लोकांना H3N2 विषाणूचा सर्वाधिक धोका असतो. दीर्घकाळ खोकला आणि सर्दी होत असेल तर 60 वर्षांवरील व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. ज्यांनी नुकतेच अवयव प्रत्यारोपण केले असेल, टीबी असेल किंवा कर्करोग असेल अशांनी H3N2 संसर्गापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. वेळेतच उपचार सुरू केले पाहिजेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.