आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुतुबमिनार नव्हे विष्णुस्तंभ:कुतुबमिनारच्या बाहेर यूनायटेड हिंदू फ्रंटचा हनुमान चालिसा, नाव बदलून विष्णुस्तंभ करण्याची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील हिंदू-मुस्लिम वाद दिवसागणिक भयंकर रूप धारण करत आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी जगप्रसिद्ध ताजमहाल हिंदू मंदिर असल्याचा दावा केल्यानंतर आता यूनायटेड हिंदू फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी राजधानी नवी दिल्लीतील कुतुबमिनार बाहेर हनुमान चालिसा पठण करुन नवा वाद उत्पन्न केला. त्यांनी कुतुबमिनार हा मुळात विष्णुस्तंभ असल्याचा दावा केला आहे.

यूनायटेड हिंदू फ्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जय भगवान गोयल यांनी मंगळवारी अन्य काही संघटनांसोबत कुतुबमिनार परिसरात हनुमान चालिसा पठण केले. हिंदू संघटना महाकाल मानव सेवेचे सदस्य या भागात निदर्शने करत आहेत. त्यांनी कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णुस्तंभ करण्याची मागणी केली आहे. "कुतुबमिनार परिसरातील मशिदींवरील सर्वच मूर्त्या काढून त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी तथा त्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली जावी," असे या संघटनांनी म्हटले आहे.

"कुतुबमिनार प्रत्यक्षात विष्णुस्तंभ आहे. तो जैन व हिंदू मंदिरांची मोडतोड करुन बांधण्यात आला. एका खास विचारधारेच्या लोकांनी यासंबंधीचा चुकीचा इतिहास लिहिला," असे यूनायटेड हिंदू फ्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी 27 हिंदू व जैन मंदिरांची मोडतोड करण्यात आल्याचा दावाही केला आहे. "मशिदीच्या संरचनेत हिंदू मूर्ती आहेत, तर मूळात ते मंदिरच असेल," असेही ते आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ म्हणालेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे काही हिंदुत्ववादी संघटनांनी नुकताच ताजमहाल हे तेजोमहालय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका याचिकेद्वारे या ऐतिहासिक वास्तुच्या 22 बंद खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. त्यावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच हिंदू संघटनांनी आता कुतुबमिनारवरही दावा सांगितल्याने मोठे अराजक माजण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...