आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana Congress Crisis; Kumari Shailajas Demand Action Against Bhupinder Singh Hooda Over Ghulam Nabi Azad Bhupinder Singh Hooda Meet

आझाद- हुड्डा भेटीवरुन वाद:हुड्डांवर कारवाईची कुमारी शैलजांची मागणी; हुड्डा म्हणाले - गुलाम नबी माझे जुने मित्र

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि काँग्रेसचा राजीनामा देणारे गुलाम नबी आझाद यांच्या भेटीवरुन हरियाणा काँग्रेसमध्ये राजकीय वादाला उकळी फुटत आहे. माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांनी हुड्डा यांच्यावर कारवाईसाठी राज्य प्रभारी विवेक बन्सल यांना पत्र लिहिले आहे. यासोबतच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणीही त्यांनी केली.

माजी प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांनी प्रदेश प्रभारी विवेक बन्सल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुलाम नबी आझाद सातत्याने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करत आहेत. तेव्हा भूपिंदर सिंह हुड्डा यांनी त्यांची भेट का घेतली. यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती.

हे तिन्ही नेते G-23 गटाशी संबंधित आहेत. चारही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बैठक झाली होती. गुलाम नबी काँग्रेसमधून स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसच्या तीन दिग्गज नेत्यांच्या या भेटीने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जी-23 गटात भूपिंदर सिंग हुड्डा यांचाही समावेश आहे. हुड्डा 2005 ते 2014 या कालावधीत सलग दोन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये, भूपिंदर सिंग हुडा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली G-23 गटाने काश्मीरमधील शक्तीप्रदर्शनात भाग घेतला होता. गुलाम नबी आणि हुड्डा यांची मैत्री फार पूर्वीपासून आहे. हरियाणाचे प्रभारी असताना हुड्डा आणि आझाद यांची ही मैत्री आणखी घट्ट झाली होती.

प्रबळ प्रतिस्पर्धी

हरियाणात चौधरी भूपिंदर सिंह हुडा आणि कुमारी शैलजा हे एकमेंकाचे कडवे प्रतिस्पर्धी आहेत. चार महिन्यांपूर्वी हुड्डा यांनी कुमारी शैलजा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी चौधरी उदयभान यांना प्रदेशाध्यक्ष केले होते. याच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई यांनी उघडपणे बंड केले होते. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकान यांच्या विरोधात मतदान करण्यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला होता. कुलदीप हे आदमपूरचे आमदार होते आणि त्यांनी 1 महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि किरण चौधरी हेही हरियाणातील हुड्डा विरोधी गटात आहेत. भूपिंदर सिंह हुड्डा 10 वर्षे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले तरीही त्यांचे आणि कुमारी शैलजा यांचे संबंध तिखटच होते. कुमारी शैलजा या सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानल्या जातात. मात्र, हुड्डा यांनी शैलजा यांच्यावर प्रदेशाध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव आणला होता. असे असतानाही शैलजा कधीच उघडपणे बोलल्या नाहीत. मात्र, आता हुड्डा यांनी गुलाम नबी आझादांची भेटल्यानंतर शैलजा यांनी हल्लाबोल केला.

कुमारी शैलजा यांनी पत्र लिहिल्यानंतर हरियाणा काँग्रेसचे प्रभारी विवेक बन्सल यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, पत्र मिळाले आहे. हे पत्र पक्षाच्या हायकमांडला पाठवेल. उर्वरित निर्णय पक्षप्रमुख घेतील.

गुलाम नबी माझे जुने मित्र

भूपिंदर सिंह हुड्डा यांनी दिव्य मराठीशी बोलताना गुलाम नबी आझाद हे त्यांचे जुने मित्र असल्याचे म्हटले. मैत्रीमुळे आमची भेट होत राहते. पत्रावर ते म्हणाले की, पत्र कोणी लिहिले याबद्दल मला माहीत नाही. लिहिले असेल तर लिहू दे.

बातम्या आणखी आहेत...