आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाथरस सामूहिक बलात्काराप्रकरणी गुरुवारी अडीच वर्षांनंतर SC-ST न्यायालयाने फैसला सुनावला आहे. कोर्टाने 4 आरोपींपैकी केवळ एक आरोपी संदीप ठाकूर दोषी घोषित केले आहे. तर लवकूश सिंह, रामू सिंह व रवी सिंह या 3 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाने संदीपला सदोष मनुष्यवध (कलम 304) व SC/ST कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे. न्यायालयाने संदीपला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
4 आरोपींपैकी कोणत्याही आरोपीवर गँगरेपचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे पीडित पक्षाच्या वकिलांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी चारही आरोपींना पेशीसाठी कोर्टात आणले गेले होते. त्यामुळे कोर्ट परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
अडीच वर्षांपूर्वी घडले होते हाथरस प्रकरण
हातरसच्या चांदपा क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली होती. 14 सप्टेंबर 2020 रोजी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बाब उजेडात आली होती. गावातीलच 4 तरुणांवर हा आरोप करण्यात आला होता. पीडितेची जीभ अत्यंत निर्दयीपणे कापण्यात आली होती. मुलीच्या भावाने गावातीलच संदीप ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलीच्या जबाबाच्या आधारावर 26 सप्टेंबर रोजी लवकुश सिंह, रामू सिंह व रवी सिंह या तिघांनाही आरोपी करण्यात आले होते. चारही आरोपींना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते.
तरुणीचा 29 सप्टेंबर रोजी दिल्लीत मृत्यू
तरुणीला गंभीर स्थितीत बागला जिल्हा संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला अलीगडच्या जे एन वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. पण प्रकृती बिघडल्यानंतर 28 सप्टेंबर रोजी तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. तिते 29 सप्टेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर रातोरात कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर निदर्शने सुरू झाली आहे. प्रकरण चिघळल्यानंतर राज्य सरकारने एसपी व सीओसह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानतंर 11 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आले.
उत्तर प्रदेश सरकारच्या शिफारशीनंतर हे प्रकरण सीबीआयला सुपूर्द करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी 104 जणांना साक्षीदार बनवले. त्यातील 35 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. 67 दिवसांच्या तपासानंतर सीबीआयने 18 डिसेंबर 2020 रोजी चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
पीडितेचे वकील म्हणाले - कुटुंबीयांनी अस्थी सांभाळून ठेवल्यात
कोर्टाच्या निकालापूर्वी पीडितेच्या वकील सीमा कुशवाह म्हणाल्या, "जवळपास अडीच वर्षांपासून पीडित कुटुंब न्यायासाठी लढा देत आहे. कुटुंबाने आजपर्यंत आपल्या मुलीचा अस्थिकलश जपून ठेवला आहे. न्याय मिळेपर्यंत अस्थिकलशाचे विसर्जन करणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. न्याय मिळेल त्याच दिवशी आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. घटनेनंतर पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली. तसेच एक नोकरी व घरही देण्याचे आश्वासन दे्यात आले. परंतु ही आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत.
पीडित कुटुंब सातत्याने संघर्ष करत आहे. त्यांना कुठेही सुरक्षेसह फिरावे लागते. बाजारात जाताना, नातलगांच्या घरी जाताना त्यांना सीआरपीएफचे सुरक्षा कवच असते. त्यांना अजूनही गावातील प्रभावशाली लोकांची भीती वाटते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नोकरी करता येत नाही. मुलींच्याही नोकऱ्या गेल्यात. मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना न्यायालय कठोर शिक्षा करेल, असा मला विश्वास आहे.
दोषींना शिक्षा मिळाल्यानंतरच पीडित कुटुंबाला न्याय मिळेल. आज कोर्टाचा निर्णय गँगरेप पीडितेच्या बाजूने आला तर देशातील महिलांना सकारात्मक संदेश मिळेल. आमच्या मुली आज शेतात काम करताना सुरक्षित नाहीत. पण या निर्णयामुळे त्यांचा आपल्या न्यायपालिकेवरील विश्वास मजबूत होईल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.