आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यूपीच्या हाथरसमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना आणि पोलिस-प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान याेगी सरकारने पोलिसांवर बडगा उगारला आहे. सरकारने हाथरसचे एसपी विक्रांत वीर, डीवायएसपी, सीओ आणि इन्स्पेक्टरसह ८ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. सरकारने घटनेशी संबंधित ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि आरोपींसह पीडितेच्या कुटुंबीयांचीही नार्काे चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोपींवर कारवाई, पीडितेचा अंत्यसंस्कार उरकल्यानंतर पोलिस-प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांच्यावर कारवाई झालेली नाही. कुटुंबीयांनी आरोप केला होता की, जिल्हाधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता.
दरम्यान, काेराेनामुळे ऋषिकेश एम्समध्ये उपचार सुरू असलेल्या भाजप नेत्या उमा भारतींनी साेशल मीडियावर सांगितले की, पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे तुमचे सरकार व भाजपच्या प्रतिमेला तडा गेला आहे. असा कोणता नियम आहे की एसआयटी तपास हाेत असताना पीडितेच्या कुटुंबीयांना मीडिया व इतरांना भेटण्यापासून राेखले जात आहे. राजकीय पक्ष व मीडियाला कुटुंबीयांची भेट घेऊ द्या, असे आपण योगींना सांगितले आहे. मला बोलायचे नव्हते, मात्र पोलिसांची कारवाई पाहून अनेक शंका उपस्थित होत आहेत.
तत्पूर्वी, पोलिसांनी पीडितेचे गाव बुलगढीला सील करत कलम १४४ लावले. नेते व माध्यमांना गावात जाऊ दिले नाही. गावातील लोकांनाही रोखण्यात आले. आम्हाला घरातच डांबण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित कुटुंब, आरोपी, पोलिसांचीही नार्को
यूपीच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांच्यानुसार, अत्याचाराबाबत कुटुंब व पोलिस या दोन्ही पक्षांचे जबाब विराेधाभासी आहेत. नार्को टेस्टच्या माध्यमातून नेमके कोण खरे बाेलत आहे, हे माहीत पडेल.
भाजपचे माजी आमदार म्हणाले मुलीला आई-भावाने मारले
दलित युवतीवरील अत्याचाराचा आरोप चार ठाकूर युवकांवर आहे. त्यांच्या बाजूने १२ गावांच्या सवर्णांची पंचायत झाली. तीत सीबीआय चौकशीची मागणी झाली. मुलीला तिच्या आई-भावानेच मारले, असा आरोप भाजपचे माजी आमदार राजवीर सिंह यांनी केला.
निर्भयाचा खटला लढलेल्या सीमा कुशवाहा यांनाही रोखले
एसडीएम आणि वकील सीमा कुशवाहांचा व्हिडिओ समोर आला. त्यात सीमा कुटुंबाला भेटण्यास जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण एसडीएम जाऊ देत नाहीत, असे दिसते. सीमा यांनीच दिल्लीतील निर्भयाचा खटला लढवला होता.
दिल्लीत जंतर-मंतरवर मेणबत्ती मोर्चा, प्रियंका वाल्मीकी मंदिरात गेल्या
प्रियंका गांधींनी दिल्लीत वाल्मीकी मंदिरात पूजा केली. पीडितेला श्रद्धांजली वाहिली. याच मंदिरात २०० दिवस मुक्काम करून गांधीजींनी स्वातंत्र्याची हाक दिली होती. संध्याकाळी जंतर-मंतरवर मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, वृंदा करात, स्वरा भास्कर, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, जिग्नेश मेवाणी सहभागी झाले.
भदोहीत अल्पवयीन मुलीची हत्या, दगडाने डोके ठेचले
यूपीच्या भदोहीत दलित अल्पवयीन मुलीची गुरुवारी दगड-विटांनी डोके ठेचून हत्या करण्यात आली. ती शौचासाठी शेतात गेली होती. मप्रच्या नरसिंहपूरमध्ये ३२ वर्षीय दलित महिलेने अत्याचारानंतर आत्महत्या केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.