आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरसमधील बुलगढी गावात दलित मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सतत नवे पेच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येऊ नये, अशी इच्छा पीडितेच्या कुटुंबीयांनीच रविवारी व्यक्त केली. त्याआधी राज्याच्या पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी सीबीआयमार्फत तपास करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यानंतर प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय तपास संस्थेला पत्र लिहिले होते. पण आता पीडितेच्या कुटुंबानेच त्याला नकार दिला आहे. पीडितेच्या १९ वर्षीय भावाने रविवारी माध्यमांना सांगितले की, ‘आम्हाला सीबीआयमार्फत तपास नको आहे. सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली जावी, अशी आमची इच्छा आहे.’ तत्पूर्वी, रविवारी राज्य सरकारच्या एसआयटीने दुसऱ्यांदा गावात जाऊन पीडितेच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला. यादरम्यान पीडितेच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे जबाब नोंदवणे थांबवून वैद्यकीय पथकाला बोलवावे लागले.
हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय विद्वेष पसरवण्याचा कट...सीएम योगींचे बनावट फोटो व्हायरल केल्याने एफआयआर
हाथरसच्या निमित्ताने जातीय- सामाजिक विद्वेष फैलावण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या कटात पीएफआयसह काही संघटनांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. लखनऊच्या हजरतगंज ठाण्यात जातीय- सांप्रदायिक विद्वेष पसरवणे, अफवा पसरवण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर एका न्यूज चॅनलचा खोटा स्क्रीन शॉट तयार करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरकारला बदनाम करण्याचा कट करण्यात आला.
सप, राष्ट्रीय लाेक दलाच्या नेत्यांचे प्रतिनिधी मंडळ आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण हेही पीडित कुटुंबाला भेटण्यास गावात आले. या वेळी दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यात काही पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले.
आराेपींवर एक कोटीचे बक्षीस ठेवले, अटक :
आराेपींचे शिर आणल्यास एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा करणारे बुलंदशहरचे काँग्रेसचे नेते निजाम मलिक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान
बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले, आई-वडिलांनी मुलींवर संस्कार करावे. अत्याचार झाला नाही, यालाही दुजोरा मिळाला आहे.
नोएडा पोलिसांना चुकीची जाणीव, प्रियकांसोबतच्या गैरवर्तनाबाबत खेद, चौकशीचे आदेश
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरांसोबतच्या गैरवर्तनाबाबत नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त केला आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले, प्रियंका गांधींसोबत झालेल्या घटनेबाबत आम्हाला खेद आहे. मुख्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.