आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण भारत मुसळधार पावसाच्या फटक्यातून सावरलेला नसतानाच आता तीव्र उष्णतेच्या कचाट्यात अडकला आहे. केरळमधील काही भागात भलेही ३५ ते ३७ अंश सेल्सियस तापमान आहे. मात्र हीट इंडेक्स (उष्णता निर्देशांक) ५४ डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. हीट इंडेक्स मनुष्याला जाणवणारी उष्णता दर्शवतो. केरळमध्ये सध्या वातावरणातील तापमान आणि हवेतील आर्द्रतेचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे उष्णता अधिक जाणवते. ही उष्णता हीट इंडेक्सद्वारे माेजली जाते. हीट इंडेक्सनुसार, तिरुवनंतपुरम, अलप्पुझा, कोट्टायम आणि कन्नूर जिल्ह्यातील काही भागात तापमान ५४ डिग्री सेल्सियस जाणवू लागले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इशारा दिला की, लोकांनी दिवसा घरातून बाहेर पडणे टाळावे. उष्माघाताचा धोका खूप वाढला आहे. सामान्यत: कासरगोड, कोझिकोड, मलप्पुरम आणि कोलममध्ये हीट इंडेक्स ४०-४५ डिग्रीपर्यंत राहतो. मागील काही दिवसांत त्याने पन्नाशी ओलांडली आहे. दुपारी उष्ण लाटा वाहत आहेत.
गोव्यातही उष्णतेची लाट, दुपारी शाळा बंद
हवामान विभागानुसार, उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात शुक्रवारी उष्णतेची लाट होती. दक्षिण गोव्यात शुक्रवारी उष्म्याची लाट होती. ११ मार्चनंतर गोव्याचे तापमान आणखी २-३ अंशांनी घटू शकते. भीषण उष्णता पाहता सरकारने शुक्रवारी आदेश काढून दुपारी भरणारे शाळांचे वर्ग बंद करण्यात आले आहे.
असे का? किनारपट्टी क्षेत्रामध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे तापमान वास्तवापेक्षा जास्त जाणवते
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमा सेन राय यांनी सांगितले की, तापमानाबरोबरच आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग या दोन घटकांमुळे तापमान जास्त किंवा कमी जाणवते. ज्याप्रमाणे हिवाळ्यात हवेच्या गतीमुळे तापमान वास्तवापेक्षा कमी जाणवते, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात ‘फील लाइक टेंपरेचर’ मध्ये आर्द्रतेची विशेष भूमिका असते. ती हीट इंडेक्सद्वारे कळते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त घाम सुटतो. परंतु वातावरणातील आर्द्रता अधिक असल्यास घाम सुकत नाही. यामुळे शरीर थंड होण्याची प्रक्रिया अत्यंत हळू होते. यातूनच उष्माघाताचा धोका वाढतो. आयएमडी हीट इंडेक्सची मोजणी करत नाही. परंतु विदेशात अनेक हवामान विभाग आणि खासगी संस्था याची मोजणी करतात.
राज्यांना सूचना : छतावर पक्ष्यांना, घराबाहेर पशूंसाठी पाणी ठेवा
नवी दिल्ली | अॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडियाने राज्यघटनेच्या कलम ५१ ए (जी)चा संदर्भ देत सर्व राज्यांंसाठी सूचना जारी केल्या आहेत. यात लिहिले की, राज्य सरकारांनी लोकांना छतावर पक्षी आणि घरासमोर बेवारस पशूंसाठी पाणी भरून ठेवण्यास सांगावे. शहरांमध्ये पोस्टर लावून लोकांत जागृती निर्माण करावी. उष्णता वाढत आहे. त्यामुळे आपल्याला पक्षी आणि प्राण्यांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.