आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात हिजाब वादात रोज नवा तिढा उद्भवत आहे. राज्यातील तुमकुरू शहरात हिजाबवर बंदीच्या हायकाेर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल १० विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गर्ल्स एम्प्रेस गव्हर्नमेंट पीयू काॅलेजच्या या विद्यार्थिनींनी बुधवार आणि गुरुवारी हिजाबबंदीचे उल्लंघन केले होते. दुसरीकडे, हिजाब घालून येणे व निदर्शने केल्याप्रकरणी राज्यभरात विविध कॉलेजमधील ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत शनिवारी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. या मुद्द्यावरून वाढत्या तणावाकडे पाहता कर्नाटक सरकारने पुढील आदेशापर्यंत शाळा व महाविद्यालये बंद केली आहेत. संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने रूढी-प्रथांतून बाहेर पडण्याचे आवाहन अल्पसंख्यकांना केले आहे. मंचाचे प्रवक्ते शाहिद सईद म्हणाले, हिजाब नव्हे, शिक्षण गरजेचे आहे.
मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसचे आंदोलन सुरूच
कर्नाटकचे मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसचे नेते विधानसभेसमाेर आंदाेलन करत आहेत. भविष्यात लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या जागी भगवा फडकेल, या ईश्वरप्पांच्या वक्तव्याचा ते निषेध करत आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री आर. अशाेक म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांच्यात मतभेद आहेत. सिद्धरमय्या यांची भूमिका वेगळी आहे.
तामिळनाडूतही वाद : भाजप नेत्याविरुद्ध कारवाईची मागणी
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान केंद्रावर शनिवारी भाजपच्या एजंटने महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले. याबाबत द्रमुक व अद्रमुकने भाजपवर टीका केली आहे. द्रमुक खासदार कनिमोझी म्हणाल्या, भाजप तामिळनाडूत धार्मिक सौहार्दता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.