आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंडेप्थ:वैचारिक कोलांटउड्या मारून मनसेला झळाळी मिळेल? जाणून घ्या, राज ठाकरेंच्या कशा बदलल्या भूमिका

भाग्यदर्शी लोखंडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. त्यांनी महाराष्ट्राला भौतिक व सांस्कृतिक विकासाचे सर्वांगसुंदर स्वप्न दाखवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत वाढलेल्या महाराष्ट्राच्या या तरुण नेत्याने आपले चुलत बंधू तथा बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या टोकाच्या मतभेदानंतर 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. या गोष्टीला आता तब्बल 16 वर्षे लोटली आहेत. तसे पाहिले तर एवढ्या अल्पकाळात कोणत्याही पक्षाला समाजमनात दृढ स्थान तयार करून स्वतःची दमदार राजकीय वाटचाल करणे अशक्यच. पण तरीही आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून काढलं आहे.

प्रारंभीच्या काळात मनसेला मराठी जनतेने डोक्यावर घेतले. त्यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे 13 आमदार विधानसभेवर पाठवले होते. राज ठाकरेंनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा पुढे करून परप्रांतीयांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर अचानक त्यांच्या महापंचायतीत जाऊन भाषणही ठोकले. आधी गुजरातेत जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री मोदींचे व त्यांच्या कामांचे कौतुक केले. पण त्यानंतर अचानक मोदी व भाजपवर टीका करून आपण त्यांचे कौतुक करून चूक केली असे जाहीरपणे मान्यही केले.

अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया की, सुरुवातीच्या यशानंतर नेमके असे काय घडले की मनसेला वारंवार आपली भूमिका बदलावी लागली? ब्लूप्रिंटवाले राज ठाकरे भगवाधारी राज ठाकरे का झाले? कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्या पक्षाला झळाळी देईल का? भाजपशी मैत्री करून मनसे शिवसेनेला शह देऊ शकेल का?

बाळासाहेबांचा सहवास ते त्यांचे कथित वारसदार

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव. दिवंगत श्रीकांत ठाकरे संगीतकार होते. पण राज यांनी संगीतापेक्षा आपल्या चुलत्यांची म्हणजे बाळासाहेबांच्या व्यंगचित्राची कला आत्मसात केली. त्यांच्या सावलीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांची वक्तृत्व कला, शब्दफेक आदी सर्वकाही बाळासाहेबांच्या तोडीचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे वारसदार मानले जात होते. शिवसेनेचे अनेक नेते ही गोष्ट खासगीत मान्यही करत होते. किंबहुना अनेकांनी ते जाहीरपणेही कबूल केले होते. शिवसैनिकांना तर राज ठाकरेंमध्येच बाळासाहेब दिसायचे. त्यांना ते शिवसेनेचे भविष्य वाटायचे. पण नंतर राज यांनी आपली चूल वेगळी मांडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

धर्मनिरपेक्ष तत्त्वावर मनसेची स्थापना

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या टोकाच्या मतभेदानंतर स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात निळा, हिरवा व भगव्या रंगाला स्थान दिले. तसेच महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटही सादर केली. यामुळे हा पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर वाटचाल करेल असे सर्वांना वाटले. राज यांनीही महाराष्ट्राच्या भौतिक व सांस्कृतिक विकासाचे स्वप्न दाखवत विशेषतः 'आपल्याला जीन्स घातलेला तरुण ट्रॅक्टर चालवताना पाहायाचा आहे,' अशी हृदयाला हात घालणारी विधाने करत जनतेचा हा विश्वास अधिकच दृढ केला.

राज ठाकरेंनी आपल्या पक्ष ध्वजात निळा, भगवा व हिरव्या रंगाला स्थान दिले होते.
राज ठाकरेंनी आपल्या पक्ष ध्वजात निळा, भगवा व हिरव्या रंगाला स्थान दिले होते.

पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत 13 आमदार अन् खळ्ळ खट्याक

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढले. त्यांच्या सभांना तेव्हाही आजच्यासारखीच गर्दी होत होती. पण, फरक एवढा की तेव्हा त्या गर्दीचे मतांत रूपांतर होत होते. मतदारांनी मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत राज याचे 13 आमदार विधानसभेवर पाठवले. ही वाटचाल कोणत्याही नवख्या पक्षासाठी अत्यंत आश्वासक होती.

पण त्यानंतर राज ठाकरेंची भूमिका अचानक बदलली. त्यांनी मराठीच्या मुद्याला हात घातला. खळ्ळखट्याकला प्राधान्य दिले. यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सभेचीही गर्दीही तशीच राहिली. किंबहुना ती अधिकच वाढली. पण दुर्दैवाने या गर्दीचे रुपांतर मतपेटीत झाल्याचे दिसून आले नाही. आजवर ही स्थिती कायम आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणतात -"कोणताही पक्ष मजबूत संघटनात्मक बांधणी असल्याशिवाय उभा राहत नाही. राज ठाकरेंच्या नेतृत्वातील ही मोठी त्रुटी आहे. राज ठाकरे एक उत्तम वक्ते आहेत. त्यांचा मर्यादित लोकांवर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या सभा गाजतात. पण, सभा गाजणे म्हणजे मते मिळवणे नव्हे. या दोन्ही पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. राज ठाकरेंनी संघटनात्मक बांधणी व कार्यकर्त्यांना सर्वंकष कार्यक्रम देण्याकडे साफ दुर्लक्ष केले."

दीक्षित पुढे म्हणतात की, "राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून वातावरण तापविण्याचा केलेला प्रयत्न अयोग्य आहे. यापेक्षा आवाजाचे प्रदूषण रोखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व धार्मिक स्थळांसाठी अंमलात आणा अशी भूमिका त्यांनी घेणे योग्य ठरले असते. मशिदीवरील भोंगे हा विषय टीव्हीवर प्रसिद्धी मिळवून देईल पण त्यातून पक्षबांधणी होऊ शकत नाही.

उत्तर भारतीयांना मारहाण

राज ठाकरेंनी मराठी भाषा व मराठी भाषकांना प्राधान्य देण्याची घोषणा दिल्यानंतर मनसेने मुंबईतील परप्रांतीयांकडे आपला मोर्चा वळवला. अगोदरच बकाल झालेल्या मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे असेच सुरू राहिले तर मराठी तरुणांची अवस्था बिकट होईल, असा नवा विचार त्यांनी मांडला. या विचारालाही महाराष्ट्राच्या तरुणाईने डोक्यावर घेतले.

2008 च्या ऑक्टोबर महिन्यात मनसेने रेल्वे भरतीची परीक्षा उधळवून लावली. या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. या घटनांमुळे मनसेचे नाव सर्वांच्याच ओठावर आले. त्याचा स्थानिक निवडणुकांत मनसेला फायदाही झाला.

'लोकशाही न्यूज'चे मुख्य संपादक दीपक भातुसे म्हणतात -"राज ठाकरे प्रत्येक टप्प्यावर प्रयोग करत आहेत. 2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये मराठीच्या मुद्यावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या पक्षाने अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा हाताळला. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी प्रमुख शहरांत त्याचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना त्यांनी पळवून लावले. त्यानंतर 2010-12 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकांत त्यांना याचा फायदा झाला. पण, त्यानंतर त्यांना त्यात सातत्य राखता आले नाही."

या निवडणुकांनंतर मनसेच्या राजकीय आलेखाचा प्रवास खालच्या दिशेने सुरू झाला. याची जाणीव बहुदा राज ठाकरेंनाही झाली होती. त्यामुळेच कदाचित ते "माझ्या हातात सत्ता द्या मी सर्वांना सूतासारखा सरळ करून दाखवेन," असे म्हणताना दिसून येत होते.

गुजरात दौऱ्यात मोदींची स्तुती

राज ठाकरे 2011 साली गुजरातच्या दौऱ्यावर गेले. तेव्हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींचा विकास पाहण्यासाठी गुजरातला गेलेल्या राज यांनी तेव्हा मोदी व त्यांच्या कामाची तोंडभरुन स्तुती केली. देशातील विशेषतः महाराष्ट्रातील राजकारण्यांनी मोदींचा आदर्श घ्यावा, अशा आशयाची विधाने त्यांनी तेव्हा केली होती. त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी त्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाला उघड पाठिंबा दिला. पण, पुढे काही वर्षांनी मोदी त्यांच्या नजरेत अचानक खुपू लागले. दुर्दैव म्हणजे आता पुन्हा ते मोदींच्याच भाजपशी जुळवून घेताना दिसून येत आहेत. आताही त्यांच्या सभेला पूर्वीसारखीच गर्दी होत आहे. पण, त्या गर्दीचे मतपेटीत रूपांतर होते किंवा नाही हे काळच ठरवणार आहे.

टाळीचे संकेत आणि फुसका बार

2015 च्या मध्यात राज ठाकरेंनी आपले चुलत बंधू तथा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. त्यावेळी त्यांनी सेनेला टाळीचे अर्थात युतीचे संकेत दिले. मनसे व शिवप्रेमींनी या दोन्ही भावांच्या संभाव्य मनोमिलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. पण, त्यानंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही. या टाळ्यांचा ध्वनी किंवा कडकडाट हवेतच विरला.

पंतप्रधान मोदींवर तिखट टीका

मनसे प्रमुखांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या धोरणांवर तिखट टीका केली. आपण यापूर्वी मोदींची प्रशंसा करुन मोठी चूक केली, असे ते म्हणाले होते. एव्हाणा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहवासात आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ते राष्ट्रवादीशी युती करून दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये सत्तेचा आस्वाद घेतील असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. पण, राज अचानक पवार व राष्ट्रवादीपासून दूर गेले.

त्यानंतर देशावर कोरोना महामारीचे संकट आले. त्यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. यातून अनेकजण सावरले. त्यांनी नव्याने सुरूवात केली. अशीच काहीशी सुरुवात राज ठाकरेंच्या मनसेनेही केली. ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेत. पण, त्यानंतरही पक्षबांधणीचे काय? असा सवाल उपस्थित होतो.

दीक्षित म्हणतात -"संघटनात्मक बांधणी अशी एक-दोन वर्षांत होत नाही. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ८० वर्षे खस्ता खाल्ल्या. त्यानंतर आता ते सत्तेत आले. काँग्रेसनेसुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळात खस्ता खाल्ल्या. स्वबळावर सत्तेत येण्यासाठी संघटनेचे बळ लागते. राज ठाकरेंच्या तुलनेत राष्ट्रवादी व शिवसेनेकडे आज तरी ते अधिक आहे. त्यात वैचारिक कोलांट्या मारल्यावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो व मतदारांनाही विश्वास वाटत नाही."

"हिंदुत्वाचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी आता निगडीत झाला आहे व अन्य पक्षांना त्याचे अनुकरण करावे लागत आहे. मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा अधिक जहालपणे मांडण्यापेक्षा मविआ सरकारचे अनेक क्षेत्रातील अपयश त्यांनी जहालपणे मांडले तर स्वतःसाठी राजकीय स्पेस तयार करू शकतात. अर्थात त्यासाठीही संघटनेची बांधणी हवीच."

अखेर हिंदुत्वाची शाल खांद्यावर

मनसेने आता खांद्यावर प्रखर हिंदुत्वाची शाल खांद्यावर घेतली आहे. आता हिंदुत्ववादी भाजपच्या मदतीने राज ठाकरे पुन्हा बाळासाहेबांचे रूप धारण करून आपली जुनी प्रतिमा नव्याने रूढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या औरंगाबादेतील सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण राजकीय गोटात त्यांच्या सभेला भाजपने गर्दी जमवल्याचा आरोप सुरू झाला. राज यांची गत काही महिन्यांतील भूमिका पाहता कदाचित त्यात तथ्यही असेल. पण, महाराष्ट्राचा हा तरुण नेता आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार होऊन पुन्हा महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी त्यांनी आपली भूमिका नेहमीसारखीच लवचिक ठेवली आहे. ते किती दिवस आपल्या नव्या भूमिकेवर ठाम राहतील, हे कुणीच सांगू शकत नाही. तूर्त राज यांच्या सभांना होणारी गर्दी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे हे मात्र नक्की.

ज्येष्ठ पत्रकार भातुसे म्हणतात -"सध्या मनसेकडे एकही मोठा नेता उरला नाही. त्यामुळे राज आता हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपबरोबर जातील असं दिसतंय. या दोन्ही पक्षांना मुंबई, नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे आदी शहरांत एकमेकांची गरज आहे. त्या अनुषंगाने राज यांचा बदलेला प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. ते अजूनही चाचपडत आहेत. त्यांचा हा प्रयोग किती यशस्वी ठरेल हे पहावे लागेल."

बातम्या आणखी आहेत...