आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्जन्य ‘भान’:‘गुलाब’ चक्रीवादळामुळे वाढणार मान्सूनचा मुक्काम, राज्यात अलर्ट, पाच दिवस जोरदार पावसाचे

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैठणसह हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता ‘गुलाब’ या चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. रविवारी सायंकाळी हे चक्रीवादळ सायंकाळी आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम ते ओडिशातील गोपाळपूर या जिल्ह्यांच्या मधील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर याचा प्रवास दक्षिण छत्तीसगड. महाराष्ट्र, गुजरातपर्यंत होईल. गुजरातेत पोहोचेपर्यंत ही वादळ प्रणाली दोन कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल. या दाब क्षेत्रांची तीव्रता कमी असेल, मात्र त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रेंगाळण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हंगाम संपण्याच्या अखेरच्या दिवशी ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस १००% सरासरी गाठण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळामुळे राज्यात दि. २६ ते ३० सप्टेंबर या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात सोसाट्याच्या वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

वादळी प्रणाली पूर्व विदर्भाकडे : हवामान विभागाने या चक्रीवादळाची संभाव्य मार्गक्रमण प्रणाली जारी केली आहे. त्यानुसार किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळ उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, उत्तर तेलंगण मार्गे पूर्व विदर्भापर्यंत येण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग कमी होऊन त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जळगाव, औरंगाबाद, जालन्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट
कुलाबा वेधशाळेनुसार दि. २६ ते ३० सप्टेंबर या काळात राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दि. २६ सप्टेंबर : उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
दि. २७ सप्टेंबर : उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा ( ११५.६ ते २०४.४ मिमीपर्यंत) ऑरेंज अलर्ट.
दि. २८ सप्टेंबर : कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. जळगाव, धुळे, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट.

मराठवाड्यात विविध दुर्घटनांत ५ बळी; मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाड्यात पावसाचा जाेर कायम आहे. विभागात विविध घटनांत एकूण पाच जणांचे बळी गेले आहेत. पावसामुळे घराचे माळवद काेसळून पैठण तालुक्यात दाेन, हिंगाेली जिल्ह्यात पुरात दाेन व नांदेड जिल्ह्यात एक जण वाहून गेला. पैठण तालुक्यातील घारेगाव येथे आजाेबा व १३ वर्षीय नात ठार झाले. हिंगाेली तालुक्यातील पाराेळा तलावात पूर पाहण्यासाठी गेलेल्या एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील साखरातांडा येथे महिला शनिवारी सकाळी ११ वाजता ओढ्याच्या पुरात वाहून गेली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हनुमंतवाडी येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या दृष्टिदाेष असलेल्या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...