आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:कोविड रुग्ण वाढताहेत, पण घाबरू नका; नागरिकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी; 2-3 दिवसांतच बरे होताहेत रुग्ण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,०५० नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. १६ सप्टेंबर २०२२ नंतर ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दैनंदिन संसर्गाचा दर ३.३९ टक्के असून तो नियंत्रणामध्ये आहे.

आरोग्यमंत्र्यांची बैठक, १०-११ रोजी मॉक ड्रिल
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांतील आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, आता सावध राहावे लागेल. अनावश्यक भीती पसरवू देऊ नका.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांतील आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, आता सावध राहावे लागेल. अनावश्यक भीती पसरवू देऊ नका.

दिव्‍य मराठी एक्स्पर्ट रिपाेर्ट
डाॅ. बाॅबी भलोत्रा, श्वसन विकारतज्ज्ञ

देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. तथापि, अद्याप तरी घाबरण्याची गरज नाही. ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट एक्सबीबी.१.१६ मुळे अचानक रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २२ मार्च रोजी कोविडच्या या सब व्हेरिएंटला मॉनिटरिंग यादीत टाकले होते. तेव्हापासून त्यांची याच्यावर नजर आहे. वस्तुत: देशातील बहुतांश लोकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी आलेली आहे. म्हणजे लसीकरण व नैसर्गिक संसर्गामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाली आहे. हीच हायब्रिड इम्युनिटी लोकांना आजारी होण्यापासून व रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखत आहे. देशातील बहुतांश नागरिकांनी लस घेतलेली आहे. उर्वरितांना लसीकरण झालेल्या या लोकांपासून संरक्षण मि‌ळत आहे. ही लस कोरोनाच्या सहा व्हेरियंट्सचा सामना करत आहे. त्यामध्ये व्हेरियंट एक्सबीबी.१.१६ चा समावेश आहे.
सध्याचा कोरोना रुग्णांचा ट्रेंड बारकाईने पाहिल्यास या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरसचा परिणाम झाल्यानंतर तापेची स्थिती दोन किंवा तीन दिवसच राहत आहे. नवा व्हेरियंट गंभीर आजाराचे कारण नसल्याचे डब्ल्यूएचओच्या अधिकारी मारिया वान केरखोव्ह यांनी सांगितले. तथापि, रुग्णसंख्या वाढण्यासोबतच यंदा नवी लक्षणे दिसत आहेत. ती आतापर्यंतच्या कोरोनाकाळात दिसली नव्हती. जसे की, यंदा ताप, सर्दी-खोकल्यासह खाज आणणारा कंजक्टिव्हायटिस व डोळे चिकट होणे आदी लक्षणेही समोर येत आहेत. इतकेच नाही तर मुलांमध्येही ही लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ही खबरदारी घेत राहा
कोविडसाठी कोणतीच नवी खबरदारी नाही. मधुमेह, दमा, सीओपीडी आदी आजारांनी पीडित लोकांनी मास्क लावल्यास इतर संसर्गापासूनही बचाव होईल. कोविड पाॅझिटिव्ह आल्यानंतर स्वत:ला आयसोलेट करा व लक्षणांनुसार डाॅक्टरांना विचारून औषधे घ्या. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या. व्हायरसचा सामना करण्यासाठी भरपूर पाणी प्या. प्रतिकारशक्ती वाढवणारी जीवनसत्त्वे घ्या आणि आॅक्सिजन पातळी खालावल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करा.