आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचे प्रत्युत्तर:म्हणाले - सर्व भोंगे बंद करा असे बाळासाहेब ठाकरे कधीच म्हणाले नाहीत, राज ठाकरेंना भाषणाच्या कॅसेट्स पाठवू

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट करत भोंग्यांवरून उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना समजून घेण्याची गरज आहे. सर्व भोंगे बंद करा, असे बाळासाहेब ठाकरे कधीच म्हणाले नाहीत. हवे तर राज ठाकरेंना आपण बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणाच्या कॅसेट्स पाठवू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच, राज्यात वातावरण पेटवण्यासाठी कुणी चिथावणीखोर बोलत असेल आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना प्रोत्साहन दिले जात असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

बेगड्या हिंदुत्ववाद्यांची दखल शिवसेना घेत नाही!
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट केल्यावरून संजय राऊत यांनी राज याच्यांवर जोरदार टीका केली. ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांच्याकडून काय हिंदुत्व शिकायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच, या देशात हिंदुत्ववादाची मशाल बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांनीच पेटवली आहे. मात्र, काही जण आता बेगडी हिंदुत्ववाद्यांच्या खिशात गेले आहेत. अशांची दखल शिवसेना घेत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात कुठेही कायद्याचे उल्लंघन नाही
महाराष्ट्रात आज स्थिती सामान्य आहे. कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. मुंबईचे पोलिस आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरत स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था रहावी, यासाठी प्रशासन सक्षम आहे. गृहमंत्री, पोलिस महासंचालक वारंवार आढावा घेत आहेत, अशी माहितीही संजय राऊत यांनी केली.

कायदा धर्मापेक्षा मोठा!
राज्यातील मशिदींवर परवानगी घेऊनच भोंगे वाजवले जात आहे. अशा स्थितीत भोंग्यांवरून का आंदोलन केले जात आहे, हेच आपल्याला समजत नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, राज ठाकरेंचा अल्टिमेटम आता संपला आहे व मनसेचे आंदोलन हे आंदोलन म्हणण्यासारखे नव्हतेच. आंदोलन फक्त शिवसेनाच करते, असे संजय राऊत म्हणाले. सुप्रीम कोर्टाने भोंग्यांबाबत केवळ मशिदच नव्हे तर मंदिर, चर्चसाठीही नियम ठरवून दिले आहेत. कायदा हा धर्मापेक्षा मोठा आहे. प्रत्येकाने या नियमांचे पालन करावे व कोर्टाचा मान राखला जाईल हे पाहावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

सर्व भोंगे बंद करा, असे बाळासाहेब म्हणाले नाही!
राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे सर्व प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद करा, असे म्हणालेच नव्हते. हिंदु धर्मीयांच्या अनेक सणांमध्ये भोंग्यांचा वापर केला जातो. तेदेखील भोंगे बंद करावे, अशी मनसेची भूमिका आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. तसेच, केवळ मशिदींवरील भोंगे बंद करावेत, अशी मनसेची भूमिका असेल तर मनसेने समान नागरी कायद्याची भाषा करू नये, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...