आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानाने मोडला 121 वर्षांचा विक्रम:1901 नंतर प्रथमच मार्चमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर, पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्रासह 9 राज्यांत उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच वाढत्या तापमानामुळे अंगाची काहिली होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाच्या मार्च महिन्यात देशातील अनेक शहरांतील पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे तापमानाचा 121 वर्षांचा विक्रम मोडित निघाला आहे. सरासरीत सांगायचे तर गत मार्च महिन्यातील तापमान 1901 च्या मार्चच्या तुलनेत 1.86 अंश सेल्सिअसने जास्त होते. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्रासह देशातील 9 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचाही इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, गत मार्च महिन्यात दिवसाचे सरासरी तापमान 33.01 अंश सेल्सिअस एवढे राहिले. 1901 च्या मार्चमध्ये हे तापमान सरासरी 32.5 अंश सेल्सिअस एवढे होते. यावर्षी मार्चमध्ये वायव्य व मध्य भारतात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले. यात राजधानी दिल्लीत सरासरी तापमान 36.8 डिग्री नोंदवण्यात आले. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने शुष्क वारे अद्याप वाहत असल्यामुळे पुढील 10 दिवसांपर्यंत पाऊस किंवा आर्द्रतेची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पारा आणखी वर जाऊ शकतो.

पाऊसही सरासरीहून 71 टक्के कमी यंदा मार्च महिन्यात सरासरी 8.9 मिलिमीटर पाऊस झाला. हे प्रमाण 'एलपीए'च्या 30.4 मिलिमीटर ते 71 टक्के कमी आहे. यापूर्वी मार्च 1909 मध्ये 7.2, तर 1908 मध्ये 8.7 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे गत महिन्यात 1901 नंतर तिसऱ्यांदा सर्वात कमी पाऊसमान झाले आहे.

हवामान खात्याने पुढील 48 तासांत गुजरात व विदर्भासह अनेक भागांसाठी इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याने पुढील 48 तासांत गुजरात व विदर्भासह अनेक भागांसाठी इशारा जारी केला आहे.

9 राज्यांत उष्णतेच्या लाटांचा इशारा

आयएमडीने एका इशाऱ्याद्वारे पुढील काही दिवसांत विदर्भासह मध्य प्रदेश, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, दिल्ली, गुजरात व झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 4 ते 8 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाजही विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा जारी केला आहे.

उन्हाळ्याच्या झळा वेळेपूर्वीच का सुरू झाल्या?

स्कायमेटनुसार, उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या घटत्या प्रभावामुळे हवेचा वेग कमी होतो. त्यामुळे तापमानात वाढ होते. यंदा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच ओसरला. यामुळेच पूर्व उत्तर व मध्य भारतात प्रचंड उष्णता पहावयास मिळत आहे. विशेषतः याच कारणामुळे यंदा मार्च महिन्यात सातत्याने कोरडे व उष्ण पश्चिम वारे वाहताना दिसून आले.

आयएमडीच्या आर.के. जेनामनी यांनी पुढील 10 दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले आहे.
आयएमडीच्या आर.के. जेनामनी यांनी पुढील 10 दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले आहे.

बद्रिनाथ व केदारनाथमधून बर्फ गायब

वाढत्या तापमानामुळे बद्रिनाथ व केदारनाथमधील बर्फाची चादर गायब झाली आहे. मागील वर्षापर्यंत येथे 4 फुटांपर्यंत बर्फाचा थर दिसून येत असे. पण, यंदा चित्र वेगळे आहे. गंगोत्री व यमुनोत्रीतही गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपेक्षेहून कमी बर्फवृष्टी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...