आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममध्ये पुराचा कहर थांबत नाही. राज्यातील ३५ पैकी ३२ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पूर, भूस्खलन यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. लाखो लोक बेघर होऊन सुरक्षित ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे. मेघालयात देखील गेल्या आठ दिवसांत किमान १८ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा व सहायक नद्याही कोपल्या आहेत. आसामच्या अनेक भागांत पुरामध्ये हजारो लोक अडकले आहेत. तेथे बचाव कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. आता लष्कराला तैनात करण्यात आले आहे. ‘भास्कर’ प्रतिनिधी पूरग्रस्त आसाममधील कामरूप जिल्ह्यात पोहोचले. तेव्हा या भागात हताश करणारे चित्र समोर दिसले. गावातील ५५ वर्षीय मोहंमद साबिर अली म्हणाले, पुरात आमची शेते बुडाली आहेत. भात शेती आणि सर्वकाही पाण्यात गेले आहे. पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. पाच दिवसांपासून जास्त त्रास जाणवू लागला आहे. आमचे काय होईल, हे समजत नाही. दोदतिया गावातील नरेश्वर भुईया म्हणाले, आमचे गाव पाण्यात बुडाले आहे. पूर्वी कधीही गावात एवढा मोठा पूर पाहिला नव्हता. दूरदूरपर्यंत पाणी आहे. जमीन दिसत नाही. खाण्यापिण्याची सामग्री शिल्लक राहिलेली नाही. एवढे पाणी असूनही आम्ही जीव मुठीत घेऊन येथे राहत आहोत. पाण्याची पातळी वाढत आहे. जवळच्या नदीत पाणी वाढल्यास घरेदारे सोडून जावे लागेल. फातिमा बेगम यांचे गावही याच जिल्ह्यात आहे. पाच दिवसांपासून रस्त्याच्या कडेला त्यांना मुक्काम करावा लागत आहे. आम्हाला काँग्रेस-भाजपविषयी काही बाेलायचे नाही. पूरग्रस्त भागातील लोक जिवंत कसे राहू शकतील, हे पाहणे गरजेचे आहे. आमच्याकडील रेशन संपले आहे. आम्हाला मदत हवी आहे. गुवाहाटीहून राष्ट्रीय महामार्ग ३१ वर पुढे जाताना दुतर्फा गावे पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. उडियाना, दोदतिया यासह परिसरातील अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. स्थानिक नागरिक केळी तसेच बांबूपासून बनवलेल्या बोटीने ये-जा करू लागले आहेत. शाळा, आरोग्य केंद्रात ८-१० फूट पाणी साचले आहे.लष्कराचे जनसंपर्क अधिकारी ए.बी. सिंह म्हणाले, आसामच्या विविध भागात लष्कराच्या १४ तुकड्यांना बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहे. ३ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आसाम व मेघालयात गेल्या सात दिवसांपासून सरासरी ते १२५ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
हाहाकार : नद्यांचे योग्य व्यवस्थापन नाही. : तज्ज्ञ
आसाम विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर जयश्री राऊत म्हणाल्या, यंदा पूरस्थिती गंभीर आहे. पावसात तीव्रता दिसून येते. त्याला हवामान बदलाशी जोडण्याऐवजी प्रमुख नद्यांशी संबंधित वनक्षेत्राशी संबंधित मुद्द्यांचा नीटपणे अभ्यास व्हायला हवा. त्यांचे योग्य व्यवस्थापन होत नाही. उत्तर भारतात असामान्य अशी तापमानात वाढ झाली होती. वन क्षेत्राची कत्तल होत आहे. नद्यांचा अभ्यास झाला तर अनेक प्रश्न सुटू शकतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.