आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर:काश्मीरमध्ये सुरक्षा दलात आठ महिन्यांत झाल्या 18 आत्महत्या, गेल्या वर्षी 12 महिन्यांत 19 जवानांनी केली आत्महत्या

श्रीनगर / मुदस्सिर कुल्लू5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाचे संरक्षण करणाऱ्यांचा मानसिक त्रासाशी मुकाबला

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांत आत्महत्या व सहकाऱ्याची हत्या करण्याच्या घटनांत वाढ होत चालली आहे. या वर्षीच्या सुरुवातीच्या ८ महिन्यांत काश्मीरमध्ये १८ जवानांनी आत्महत्या केल्या. आपल्याच सहकाऱ्यांच्या हल्ल्यात अन्य सहा जवानांना प्राण गमवावे लागले. लष्कर, निमलष्करी दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये १९ जवानांनी आत्महत्या केली होती. यंदा आठ महिन्यांतील आत्महत्येने गेल्या वर्षीच्या आकडेवारीची बराेबरी केली. सुरक्षा दलातील जवानांना गरजेपेक्षा जास्त वेळ काम करावे लागत आहे, हे आत्महत्येमागील कारण सांगितले जाते. त्यांना कुटुंबापासून दीर्घ काळ दूर राहावे लागते. त्यातून तणाव व नैराश्याचे ते शिकार होतात. दहशतवादप्रतिबंधक मोहिमांत तैनात असलेले जवान जास्त वैतागून गेले आहेत. अनेकवेळा त्यांचे धैर्य टिकून राहत नाही.

कोरोनाची भीती : मेमध्ये एकाच दिवशी सीआरपीएफच्या एसआय, एएसआयची आत्महत्या
यंदा आत्महत्येमागील कारण कोरोना संकट सांगितले जाते. सीआरपीएफमधील दोन घटनांनी त्यास अधोरेखित केले आहे. १२ मे रोजी अनंतनाग जिल्ह्यातील अक्रुर्ण मट्टन भागात सीआरपीएफच्या एका उपनिरीक्षकाने आपल्याच रायफलने गोळी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. मी घाबरलोय. मी कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो. मृत्यूला जवळ केलेलेच बरे, असे पत्र त्यांनी लिहून ठेवले. त्याचदिवशी श्रीनगरच्या करण नगर भागात सीआरपीएफच्या एका सहायक निरीक्षकाने देखील गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमागे देखील कोरोनाची भीती असे कारण सांगितले जाते.

कौटुंबिक समस्या सोडवण्यात अपयशी जवानांच्या आत्महत्या : तज्ञ
काश्मीरमधील मनोतज्ञ डॉ. यासिर हसन राथर म्हणाले, दर महिन्याला माझ्याकडे अनेक जवान मानसिक समस्यांवर उपचारासाठी येतात. कडक कार्यसंस्कृतीमुळे ते कशाप्रकारे हैराण झाले आहेत, ही गोष्ट सैनिक सांगू लागतात. मानसिक आरोग्यविषयक सल्लागार वसीम राशिद म्हणाले, कौटुंबिक समस्या दीर्घकाळ सोडवू न शकल्यामुळे तणावाखाली वावरतात. अशा परिस्थितीत ते कधी-कधी आत्महत्येचा मार्ग निवडतात.

सुरक्षा दलाचे उपाय : समुपदेशन सत्र, मानसिक व्यायामावर भर
श्रीनगरमध्ये सीआरपीएफचे जनसंपर्क अधिकारी पंकज सिंह म्हणाले, जवानांना तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशन सत्र चालवले जात आहे. त्याशिवाय सकाळी व्यायामात मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विशिष्ट पद्धतीही शिकवल्या जात आहेत. त्यामधून जवानांना तणाव व्यवस्थापन करता येऊ शकेल. आपले सहकारी दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहाणार नाहीत, यासाठी वरिष्ठांनी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे ते कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser