आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नाट्य संपुष्टात:राजस्थानात अशोक गहलोत सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कवच-ढाल, गदा-भाला होऊन सरकार सुरक्षित ठेवेन : पायलट

राजस्थानमध्ये एक महिन्यापासून सुरू असलेले राजकीय नाट्य शुक्रवारी संपुष्टात आले. विधानसभेत अशोक गहलोत सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर आवाजी मतदानाने विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाला. गहलोत यांनी ट्विट करत म्हटले, ‘देशात नवनिर्वाचित सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असलेल्या शक्तींसाठी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकणे एक संदेश आहे.’

पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या माघारीनंतर बहुमतामुळे आश्वस्त असलेल्या सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला होता. सभागृहात चर्चेदरम्यान गहलोत यांनी म्हटले की, “सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली है,’ अशी अवस्था आज भाजपच्या लोकांची झाली आहे. ते निराश झाले असावेत. सरकार पाडण्याच्या कारस्थानात कोण कोण केंद्रीय मंत्री सहभागी होते हे फोन टॅपमध्ये कळाले आहे. पूर्ण चार महिने तुम्ही कशा प्रकारे षड््यंत्र केले याला संपूर्ण देश साक्षी आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी मी राजस्थानमधील सरकार पडू देणार नाही.” मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्याला उद्देशून म्हटले, “संपूर्ण प्रकरणाचा ज्या चांगल्या पद्धतीने शेवट झाला त्याचा सर्वात मोठा धक्का देशात कोणाला बसला असेल तर तो अमित शहा आणि तुम्हाला बसला असेल.”

विधानसभेतील पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास सत्ताधारी पक्षाकडे १२२ संख्याबळ आहे. त्यात काँग्रेसमध्ये विलीन झालेल्या बसपच्या ६ आमदारांचाही समावेश आहे. त्याशिवाय सहकारी पक्षांचे ५ आणि अपक्ष आमदारही सरकारच्या बाजूने आहेत. विरोधात ७५ आमदार आहेत. त्यात भाजपच्या ७२ व सहकारी आरएलपी पक्षाच्या ३ आमदारांचा समावेश आहे.

कवच-ढाल, गदा-भाला होऊन सरकार सुरक्षित ठेवेन : पायलट
विधानसभेत आसन बदलण्याच्या मुद्द्यावर सचिन पायलट म्हणाले, “आज मी सभागृहात आलो तेव्हा माझे आसन मागे ठे‌वण्यात आले आहे असे मला दिसले. मी शेवटच्या रांगेत बसलो आहे. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राजस्थानमधून मी आलो आहे. सीमेवर सर्वात मजबूत शिपाई तैनात असतो. मी जोपर्यंत येथे बसलो आहे तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. या सीमेवर कितीही गोळीबार झाला तरी आम्ही सगळे लोक तसेच मी कवच आणि ढाल, गदा आणि भाला होऊन येथे सुरक्षित ठेवू.”

बातम्या आणखी आहेत...