आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणनीती:यूपीत भाजपच्या ‘बूथ’ पॉलिटिक्सला काँग्रेसचे कॅलेंडर पॉलिटिक्सने उत्तर

लखनऊ / विजय उपाध्यायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2022 च्या विधानसभेसाठी सर्व पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत सर्व पक्षांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने “मेरा बूथ सबसे मजबूत’चा नारा देत सरकार व संघटनात्मक कार्यपद्धतीत बदल केला आहे, तर काँग्रेसने नवीन ‌वर्षात आदिवासी व मागासवर्गीयांची मते वळवण्यासाठी “कॅलेंडर पॉलिटिक्स’ सुरू केले आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी-वाड्रा यांचे सोनभद्र-हाथरसमधील पीडित कुटुंबांचे अश्रू पुसतानाच्या छायाचित्रांसह १० लाख कॅलेंडर घरोघरी वाटण्याची तयारी केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच सपा, बसपा आणि काँग्रेसकडून बूथ कमिट्या तयार केल्या जात आहेत. समाजवादी पक्षाकडून ग्रामीण भागांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत.

काँग्रेस : १० लाख कुटुंबांना जोडण्याचे ध्येय
“कॅलेंडर पॉलिटिक्स’च्या माध्यमातून काँग्रेस १० लाख कुटुंबाशी संपर्क साधणार आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांचे फोटो असणारे १० लाख कॅलेंडर काँग्रेसचे कार्यकर्ते गावांत आणि शहरांत वाटतील. प्रत्येक जिल्हा आणि शहर कमिटीसाठी कॅलेंडर दिले जात आहे. यात हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला भेटताना आणि पोलिसांच्या लाठीचार्जपासून कार्यकर्त्यांचा बचाव करतानाचे छायाचित्र लावले आहे. तसेच गटपातळीवर काँग्रेस कमिटी बनवणे सुरू केले आहे.

कार्यपद्धती बदला; नड्डांचा मंत्र्यांना सल्ला
जे. पी. नड्डा यांनी मंत्र्यांना कार्यपद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, यश “मी’ नव्हे, तर “आपण’ मिळवले आहे ही भावना आपल्यामध्ये रुजवण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे टीमवर्क मजबूत होते आणि चांगल्या टीमवर्कमुळेच भाजपने वेळोवेळी यशाला गवसणी घातली आहे. मंत्र्यांनी घरात न बसता कार्यालयात बसावे. तसेच प्रभार असलेल्या जिल्ह्यांमध्ये जनसंपर्क वाढवावा, असेही ते म्हणाले.

बूथ जिंकले तर निवडणुकीतही विजय पक्का : जे. पी. नड्डा
जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, राजकारणात विचारांच्या आधारे वाटचाल करणारा नेहमी यशस्वी होत असतो. भाजप नेहमीच विचार, सिद्धांतांवर चाललेला आहे. यामुळेच लडाखपासून ते केरळपर्यंत भाजपचा बोलबाला आहे. आता बूथ पातळीवर संघटना आणखी भक्कम करण्याची आवश्यकता आहे. कारण बूथ ताब्यात असल्यास निवडणुकीतील विजय पक्का असतो. कार्यकर्ता आणि कार्यक्रम असणारा भाजप एकमेव पक्ष आहे, असेही नड्डा म्हणाले.