आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनची नाकेबंदी:चीनने घुसखोरी केली तर भारतीय लष्कर आता गोळीबारही करेल, लष्कराला पूर्ण मोकळीक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या एलएसीवर गोळी चालवायची नाही असा करार आहे, तो मोडू शकतो

चीनसोबत १५ जून रोजी झालेल्या संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या रशिया दौऱ्यापूर्वी रविवारी लडाखच्या सध्याच्या स्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी सांगितले की, सरकारने सशस्त्र दलांना नियंत्रण रेषेवर चिनी लष्कराच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तसेच,पूर्व लडाख व इतर भागांत चिनी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सज्ज राहण्याचे सांगितले.

संरक्षणमंत्री सोमवारी रशियात होणाऱ्या विजय दिनाच्या लष्करी संचलनात भाग घेण्यासाठी मॉस्कोला जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी सीडीएस प्रमुख जन. बिपिन रावत यांच्यासह लष्करप्रमख जनरल एम. एम. नरवणे, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया आणि हवाईदलाचे करमबीर सिंह यांच्याशी चर्चा केली. संरक्षणमंत्र्यांनी लष्कराने जागरूक आणि सतर्क राहावे, अशी सूचना केली. दरम्यान, १९९६च्या एका करारानुसार एलएसीवर २ किमी क्षेत्रात गोळीबारास मनाई आहे.

लष्कराच्या ७५ जवानांचा रशियाच्या विजय दिन संचलनात सहभाग

रशियाच्या विजय दिन संचलनात भारताच्या तीन दलांचे ७५ सदस्यांचे संयुक्त पथक भाग घेण्यासाठी मॉस्को येथे गेले आहे. हे संचलन दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर सोव्हियतच्या विजयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला ३३ लढाऊ विमानांच्या प्रस्तावास गती देण्याचे सांगितले असतानाच राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर जात आहेत. तसेच मागील काही वर्षांत अपघातग्रस्त झालेली १२ सुखोई विमाने बदलण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

भारत-चीन यांच्यातील तणाव टोकाला, मदतीस तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन यांच्यातील तणाव सध्या टोकाला गेला असल्याचे नमूद करून ही परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला. ते म्हणाले, “या दोघांतील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थीची तयारीही त्यांनी दर्शवली. ट्रम्प म्हणाले, स्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. भारत व चीन या दोन्ही देशांशी आम्ही चर्चा करत आहोत.’ ट्रम्प यांनी २९ मे रोजी दोन्ही देशांतील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भारताने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चिनी लष्कर भारतीय सीमेवर तणाव वाढवत असल्याचे नमूद करून सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला कारस्थानी असे संबोधले होते. गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झाल्यापासून अमेरिकेचे याकडे लक्ष असून या घडामोडींवर सातत्याने भाष्य सुरू आहे.

राहुल म्हणाले, नरेंद्र मोदी खरे तर सरेंडर मोदी आहेत; हा तर पंतप्रधान, देशाचा अपमान : भाजपचे प्रत्युत्तर

सीमेवर तणाव असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सलग पाचव्या दिवशी पंतप्रधानांना लक्ष्य केले. रविवारी त्यांनी जपान टाइम्सचा एक लेख रिट्विट करून नमूद केले की ‘नरेंद्र मोदी वास्तविक सरेंडर मोदी आहेत.’ या लेखात म्हटले आहे की, भारताने जे चीनबाबत तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले होते त्याचा कसा बोजवारा उडाला आहे. या ट्विटनंतर भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी पलटवार केला. ते म्हणाले, राहुल पंतप्रधान आणि देशाचा अपमान करत आहेत. असे शब्द शत्रू देशाचा नेतादेखील वापरत नाही.

- सरकारने घातक शस्त्रांच्या खरेदीसाठी ५०० कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. हा निधी असमान्य स्थितीत मंजूर केला जातो.

- तज्ञांचे मत : चीनने पँगोंग खोऱ्यात ८ किमी परिसर बंद केला आहे. पुढील वाद पँगोंग खोऱ्यावरूनच पेटवला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...