आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा तेच गलवान...:चीनने खंजीर खुपसला; 20 जवान शहीद, 43 चिनी सैनिक मृत किंवा जखमी, चीनचे संख्येबाबत मौन

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी हल्ल्यात 17 सैनिक नदीत पडले, हाडे गाेठवणाऱ्या थंडीमुळे गमावले प्राण

लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवर ४२ दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाने रक्तरंजित रूप घेतले. भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेऊन ठाण मांडून बसलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला. यात भारतीय लष्कराचे कर्नल दर्जाच्या कमांडिंग ऑफिसरसह २० जवान शहीद झाले. सरकारी सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार यात चीनचे ४३ सैनिक एक तर मारले गेले किंवा जखमी झाले आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन यांनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याला पुष्टी दिली. मात्र, चीनने यावर मौन बाळगले आहे. भारत-चीन सीमेवर १९७५ नंतर ४५ वर्षांनी प्रथमच जवान शहीद झाले आहेत. विशेष म्हणजे या चकमकीत गोळीबार झालाच नाही. लष्कराच्या अधिकाऱ्यांनुसार, सोमवारी रात्री जेथे हिंसाचार भडकला तेथून दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले आहेत. यात लष्कराचा एक अधिकारी व दोन जवान शहीद झाले होते. या चकमकीदरम्यान गलवान दरीत पडलेल्या १७ जवानांचा तापमान शून्याखाली असल्यामुळे गारठून मृत्यू झाला. हे सर्व जवान बिहार रेजिमेंटचे होते. दोन महिन्यांपासून चिनी सैनिकांनी भारतीय भूभागाचा ताबा घेतला आहे.

सोमवारी रात्री चकमकीनंतर मंगळवारी सकाळी दोन्ही देशांच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हा तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा चर्चा केली. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच ही चर्चा केली. शांतता नांदावी म्हणून प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.

राजधानी दिल्लीत बैठकांचे सत्र

संरक्षणमंत्र्यांची लष्करी अधिकाऱ्यांशी तर रात्री उशिरापर्यंत मोदी-शहा चर्चा

दरम्यान, भारतीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही माहिती दिली. यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी आणि सुरक्षा समितीची बैठक झाली. यात गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची उपस्थिती होती. यानंतर रात्री उशिरापर्यंत मोदी आणि शहा यांची पुढील धोरणाबाबत चर्चा सुरू होती. दुसरीकडे सशस्त्र दलांच्या बैठकाही सुरू होत्या.

कोरोनामुळे खचलो नाही; कोणाशीही टक्कर घेऊ शकतो, असे चीन भासवतोय

१. राजकीय इशाऱ्यावर हे झाले?

स्थानिक कमांडरांनी राजकीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावरूनच एवढे मोठे कृत्य केले असावे. ते चिथावणीचे कारण मानू शकत नाही. दोन्ही बाजंूनी लष्कर मागे घेण्याचा करार झाला होता. भारतीय कमांडर चिनी लष्कराने माघार घेतल्यावर लक्ष ठेवून होते. चिनी नेतृत्वाला संदेश द्यायचा होता की ही एकतर्फी कारवाई नाही. हिंसाचाराची ही घटना स्वत:ला विजयी दाखवण्याची चाल आहे.

२. चीनने हीच वेळ का निवडली?

चीनला जगाला आपल्या ताकदीचा संदेश द्यायचा आहे. कोरोनाने काहीच नुकसान झाले नाही हे त्याला दाखवायचे आहे.

३. भारताचीच निवड का?

अनेक कारणे आहेत. अमेरिकेने जी-७ ची कक्षा वाढवत भारताला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका- भारताचे संबंध दृढ होत असल्याने चीन हताश आहे. एफडीआय धोरणात केलेल्या बदलामुळेही चीन नाराज आहे. हाँगकाँग व तैवानवरून चीन सरकार निराश आहे. राजकीय तणावही यास कारणीभूत आहे.

४. चीनचा हेतू काय आहे?

जर अमेरिकेची साथ नसेल तर सीमेत घुसून खेळ बदलू शकतो हे दाखवणे. जवळच्या भागात मनमानी करायची आहे. दक्षिण चिनी समुद्र, तैवान, हाँगकाँग व भारताची कुरापत काढून जगभरात ताकद दाखवणे.

वादाचे कारण- २५५ किमी लांबीचा रस्ता

१९६२ चे युद्ध गलवान घाटीतूनच सुरू झाले होते. याला जोडून असलेल्या अक्साई चीन भागावर चीनचाच ताबा आहे. भारतीय सैनिक गलवान नदीत नावेतून गस्त घालतात.

- चीनचा तीळपापड होण्याचे कारण म्हणजे २५५ किमीचा भारतीय जवानांनाना लडाखचा मार्ग सुकर करणारा रस्ता होय.

- सीमेवरील शेवटचे गाव श्योकहून दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्त्यावर १५ वर्षापूर्वी काम सुरू झाले होते. आता ते पूर्णत्वाकडे आहे. यात गलवानमध्ये एक छोट्या भागाचे काम सुरू आहे. यावर चीनचा आक्षेप आहे. या मार्गावर २०० किमीचे कंुपणही पूर्ण झालेले आहे.

- चीनचा आक्षेप असूनही भारताने रस्त्याचे काम वेगाने सुरूच ठेवले.

- वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांत दोन महिन्यांत १० हून अधिक बैठका झाल्या. ६ जूनला लेफ्ट. जनरल पातळीवर एक बैठक झाली. यात सैनिकांनी या पॉईंटवरून माघार घेण्याचे ठरले. मात्र, तेवढ्यात हा हिंसाचार पेटला.

चिनी हल्ल्यात 17 सैनिक नदीत पडले, हाडे गाेठवणाऱ्या थंडीमुळे गमावले प्राण

गलवान खाेऱ्यात तैनात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘भास्कर’ चे प्रतिनिधी मुकेश काैशिक यांना प्रत्यक्षात जे घडले ते सांगितले. ते म्हणाले- सुमारे १५ हजार फूट उंचीवरील गलवान खाेऱ्यात घटनास्थळी साेमवारी दुपारी ४ ते मध्यरात्रीपर्यंत, सुमारे ८ तास हिंसाचार सुरू हाेता. लाेखंडी शिगा हाती घेतलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर सरळ हल्लाच चढविला. भारतीय सैनिकांसाठी ताे अत्यंत अनपेक्षित हाेता. भारत आणि चीनच्या वरिष्ठ कमांडरनी ६ जूनला दाेन्ही देशांचे सैन्य २-३ किलाेमीटर माघारी सरकेल, असा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार चिनी सैनिकांना एलएसीवरील पाेस्ट-१ पर्यंत जायचे हाेते. ही प्रक्रिया ७ दिवसांपासून सुरू हाेती. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी दाेन्ही सैन्यांकडून विशेष पथके तैनात हाेती. साेमवारी दुपारी भारतीय कमांडिंग आॅफिसरसह १० सैनिक हे पेट्राेलिंग पाॅइंट-१४ जवळ चिनी सैनिकांच्या माघारीच्या हालचालींवर लक्ष ठेवून हाेते. २० चिनी सैनिकांना माघारी जायचे हाेते. परंतु ते न परतल्याने हाणामारी सुरू झाली. चिनी सैनिकांनी अचानक भारतीय कमांडिंग आॅफिसरवर हल्ला केला. त्यांना खाली पाडून लाेखंडी शिगांनी मारले. भारतीय सैनिकांनीही त्यात चाेख प्रत्युत्तर दिले. काही मिनिटांनी चीनचे दुसरे गस्ती पथक तेथे पाेहाेचले. त्याच वेळी भारताचेही दुसरे पथक आले. त्यानंतर येणाऱ्या सैनिकी तुकड्यांची संख्या वाढू लागली. चीनच्या बाजूने किमान ८०० सैनिक जमा झाले. तुलनेत भारतीय सैन्य कमी हाेते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दाेन्ही बाजूंनी आक्रमण सुरू झाले. सैनिक दगड, काठ्या आणि लाेखंडी शिगांनी एकमेकांवर हल्ले करत हाेते. त्यामुळे छाेट्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. 

अंधारात अंदाज न आल्यामुळे अनेक सैनिक गलवान नदीपात्रात काेसळले. त्याच वेळी पूल तुटल्यामुळे चीनचेही ४० ते ५० जवान नदीत पडले. भारतीय सेनेचे काही जवान अद्यापही बेपत्ता आहेत. ते नदीत पडले की चीनच्या ताब्यात आहेत, याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही. एक चिनी कमांडिंग आॅफिसरदेखील त्यात मारला गेला, किंवा नदीत पडल्याचेदेखील सांगण्यात येत हाेते. सैनिकांदरम्यान धुमश्चक्री रात्रीपर्यंत सुरूच हाेती. दाेन्ही देशांचे सैनिक पाठलाग करून हल्ले चढवत हाेते. रात्री १२ नंतर हा प्रकार थांबला. लगेच दाेन्ही देशांच्या सैनिकांनी आपल्या जवानांचा शाेध सुरू केला. याच वेळी नवी दिल्ली आणि बीजिंगदरम्यान हाॅटलाइनवर चर्चा हाेत हाेती. मंगळवारी सकाळी पुन्हा दाेन्ही देशांच्या सेना दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी बैठका सुरू केल्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एलएसीनजीक चिनी हेलिकाॅप्टर त्यांच्या सैनिकांचे पार्थिव नेण्यासाठी दाखल झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...