आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व लडाखमध्ये चीनने पुन्हा काही कुरापत करू नये म्हणून भारताने या भागातील लष्करी तैनाती लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तैनाती मागे घेण्यात आली तरच सीमावर्ती भागात शांतता नांदू शकेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग्ची यांनी लडाख प्रश्नावरील भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. लष्करी तैनात काेणत्याही देशाच्या हितासाठी याेग्य राहणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले हाेते. याची चीनला पुरेशी कल्पना आहे. त्यामुळेच शेजारी राष्ट्राने भारतासाेबत राहून तैनाती मागे घेण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. चीन त्यादृष्टीने काम करेल, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
पँगाँग तलावाच्या परिसरातील लष्करी आघाडी अनावश्यक स्वरूपाची आहे. दाेन्ही बाजूने ही बाब मान्य करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख नरवणे यांनी भारताचा धाेका कमी झालेला नसल्याचा इशारा दिला हाेता. कारण पँगाँग भागातून चीनची तैनाती मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले हाेते. भारत व चीन यांच्या अलीकडेच सीमासंबंधी समन्वय आणि विचारविनिमयासाठी एका यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करून ताेडगा काढण्याची तयारी उभय बाजूने दर्शवण्यात आली आहे. यंत्रणेच्या स्थापनेबाबत दाेन्ही देशांच्या वरिष्ठांमध्ये सहमती झाली हाेती. त्यानंतर या दिशेने काम केले जात आहे.
गेल्या वर्षी सीमेवर पेच, चर्चेच्या दहा फेऱ्या
भारत-चीन यांच्यात गेल्या वर्षी ५ मे राेजी पँगाँग तलावाच्या भागात सैन्य तैनातीनंतर संघर्ष उडाला हाेता. चीनने हजाराे सैनिकांच्या तैनातीला सुरुवात केली हाेती. या भागात सशस्त्र सैनिकांसह प्रचंड दारुगाेळा आणला जात हाेता. त्यामुळे तणावात वाढ झाली हाेती. त्यानंतर दाेन्ही बाजूने लष्करी, राजनैतिक स्तरावर चर्चेच्या दहा फेऱ्या पार पडल्या. अखेर २० फेब्रुवारी राेजी दाेन्ही लष्करांनी तैनाती मागे घेण्याबद्दल सहमती दर्शवली. भारताने शांततेसाठी तैनाती तत्काळ मागे घेण्यावर भर दिला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.