आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेय, उत्पादनात भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार : बिल गेट्स

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस प्रभावी व सुरक्षित आहे हे निश्चित झाले की मग भारताने तिचे उत्पादन करावे

कोरोना लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. लसीचा शोध लागला की तिचे उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमताही भारताकडे आहे, असे मत मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

गेट्स म्हणाले की, लसीचे उत्पादन करण्यासाठी आम्हाला भारताची गरज आहे. २०२१ च्या सुरुवातीपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचे उत्पादन होईल. ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे हे एकदा का निश्चित झाले की मग भारताने तिचे लवकरात लवकर उत्पादन करावे आणि तिचा जगाला पुरवठा करावा, अशी आमची अपेक्षा आहे. भारतात लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठीही भारताची मदत लागेल. जगात कुठेही लसीचा शोध लागला तरी भारतात तिचे उत्पादन होईल. जागतिक स्तरावर वैज्ञानिक आणि औषध कंपन्या कोरोना विषाणूवरील लस लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी काम करत आहेत. काही लसी चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आहेत, असा उल्लेख करून गेट्स म्हणाले की, आमचे फाउंडेशन भारताच्या नीती आयोेगासोबतच याविषयी चर्चा करत आहे. आयसीएमआर या लसींच्या नियामक पैलूंचा अभ्यास करत आहे. भारतीय औषध उद्योग मोठ्या प्रमाणावर जगासाठी वेगवेगळ्या लसींचे उत्पादन करतो. या उद्योगाकडे कुठल्याही लसीचे उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमता आहे. त्या पृष्ठभूमीवर बिल गेट्स यांनी हे मत व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीमुळे ३.७ कोटी लोकांवर गरिबीची कुऱ्हाड
बिल गेट्स फाउंडेशनच्या एका अहवालानुसार, कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने ३.७ कोटी लोकांवर गरिबीची कुऱ्हाड कोसळली. याचा परिणाम आरोग्य क्षेत्रावरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाचा हवाला देत गोलकीपर्स रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या महामारीमुळे २०२१च्या अखेरपर्यंत जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी १३३२ लाख कोटी रुपये खर्च केले तरी यात ८८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान हाेईल. भारत यातून मार्ग काढण्यासाठी २० कोटी महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न हाती घेईल आणि या महिलांच्या हाती रोख पैसे देईल, असेही अहवालात नमूद आहे.