आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हाती घेतलेला भारत सर्वाधिक लस देणाऱ्या देशांत तिसऱ्या स्थानी आला आहे. भारताने याबाबतीत इस्रायलला (५४.४० लाख) मागे टाकले आहे. आता फक्त अमेरिका (२.८९ कोटी) आणि ब्रिटन (१.२० कोटी) हेच देश भारताच्या पुढे आहेत. केंद्र सरकारने ही माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५७,७५,३२२ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यात ५३,०४,५४६ आरोग्य कर्मचारी व ४,७०,७७६ फ्रंटलाइन कार्यकर्ते आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६,७३,५४२ डोस देण्यात आले आहेत. दुसरीकडे, कोरोनाची एकूण नवी प्रकरणे सध्या सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील (८४.४३%) आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ५,९४२ नवे संक्रमित आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात २,७६८, कर्नाटकनात ५३१ नवी प्रकरणे समोर आली. गेल्या २४ तासांत ७८ मृत्यूंची नोंद झाली, ही नऊ महिन्यांतील सर्वात कमी संख्या आहे. पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत ६९.२३% मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक २५ मृत्यू झाले, तर केरळमध्ये १६ आणि पंजाबमध्ये ५ मृत्यूंची नोंद झाली. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडाही दीड लाखापेक्षा कमी (१,४८,७६६) झाला आहे.
अहवाल : ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीचा कोरोनाच्या आफ्रिकी स्वरूपावर परिणाम कमी ब्रिटिश औषध निर्माती कंपनी अॅस्ट्राझेनेकाने म्हटले आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत विकसित केलेली आमची लस कोरोनाच्या आफ्रिकी स्वरूपावर (स्ट्रेन) कमी परिणामकारक ठरली आहे. एका चाचणीच्या सुरुवातीच्या आकड्यांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. सुमारे २००० लोकांवर केलेल्या चाचण्यांत असे आढळले की, ही लस या स्वरूपावर मर्यादित सुरक्षाच प्रदान करते.
बांगलादेशात रविवारपासून लसीकरण सुरू
ढाका | बांगलादेशात रविवारपासून भारताकडून मिळालेली लस देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या महिनाभरात ३५ लाख जणांना लस दिली जाईल. देशात १,०१५ लसीकरण केंद्रे बनवण्यात आली आहेत. त्याआधी पहिल्या महिनाभरात ६० लाख लोकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. पण योजनेवर फेरविचार केल्यानंतर संख्या घटवण्यात आली. भारताने बांगलादेशला सीरम लसीचे २० लाख डोस भेटीदाखल पाठवले आहेत.
श्रीलंकेत पुढील महिन्यापासून सामान्यांना लसीकरण
कोलंबो | श्रीलंकेत सामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम पुढील महिन्यापासून सुरू केला जाईल. सध्या कोरोना आघाडीवर तैनात २,६०,००० लोकांना डोस दिला जाईल. श्रीलंकेत आतापर्यंत फक्त भारतात तयार झालेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीलाच आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. भारताने गेल्या आठवड्यात या लसीचे ५ लाख डोस श्रीलंकेला नि:शुल्क दिले आहेत.
भारताने अफगाणिस्तानला पाठवली कोरोनाची लस
भारताने मानवीय मदतीअंतर्गत रविवारी एअर इंडियाच्या विमानाने अफगाणिस्तानला कोरोनाची लस पाठवली. भारताकडून ५ लाख डोस मिळणार आहेत, असे अफगाणिस्तानने म्हटले होते. भारताने आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका आणि बांगलादेशसहित शेजारी देशांना स्वदेशी कोरोना लस पाठवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.