आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:पाकच्या हद्दीत 124 किमी आत भारतीय क्षेपणास्त्र पडले, तांत्रिक चुकीमुळे डागले गेल्याचा भारताचा खुलासा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

पाकिस्तानी सीमेच्या आत पंजाबच्या मियां चुन्नू भागात ९ मार्चला सायंकाळी सहा वाजता भारतीय सीमेतून पडलेली वस्तू म्हणजे भारताचे क्षेपणास्त्र होते. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयमध्ये एकच खळबळ उडाली होती. भारतीय संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘नियमित दुरुस्तीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे अपघाताने हे क्षेपणास्त्र डागले गेले होते. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत उच्चस्तरीय कोर्ट आॅफ इन्क्वायरीचा आदेश दिला आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भागात पडले. ही घटना अत्यंत खेदजनक आहे, पण दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.’

या घटनेनंतर पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रभारी अधिकाऱ्याला बोलावून घेतले होते. ‘उडणाऱ्या भारतीय सुपरसाॅनिक वस्तू’द्वारे हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्याचबरोबर या घटनेची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ही वस्तू भारतातील सिरसा येथून सायंकाळी ६.४३ वाजता पाकिस्तानात घुसली होती आणि पंजाब प्रांतातील मियां चुन्नू शहरात सायंकाळी ६.५० वाजता जमिनीवर पडली. त्यामुळे काही नागरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. टायमिंग आणि मॅपनुसार, या प्रोजेक्टाईल (शस्त्राशिवाय क्षेपणास्त्र)ने 261 किमी अंतर 7 मिनिटांत कापले.

भारताने हवाई हद्दीचे उल्लंघन केले : पाकिस्तान
या घटनेनंतर पाकिस्तानने म्हटले आहे की, हे क्षेपणास्त्र पाक हद्दीत कोसळले असले तरी यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण आकस्मिकपणे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालाच होता. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, भारताने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून लोकांचे प्राण संकटात टाकले. त्यामुळे सौदी अरेबिया आणि कतार एअरलाइन्सच्या उड्डाणांसह देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम होऊ शकत होता. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारतीय क्षेपणास्त्र आमच्या हद्दीत पडल्याप्रकरणी सविस्तर माहिती चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या राजनयिक अधिकाऱ्यांनाही दिली जाईल.

विमान प्रवाशांच्या जिवाला धोका झाला असता
पाकिस्तानचे एअर व्हाइस मार्शल तारिक झिया यांनी म्हटले की, घटनेच्या वेळी दोन हवाई मार्ग सक्रिय होते आणि अनेक व्यावसायिक उड्डाणे पाकिस्तानी क्षेत्रात होती. भारतीय सुपरसाॅनिक वस्तू ४० हजार फूट उंचावर होती आणि प्रवासी विमाने ३५ ते ४२ हजार फुटांच्या उंचीवर असतात. त्यामुळे हा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकला असता.

बातम्या आणखी आहेत...