आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्रो पुढील ८ महिन्यांत प्रथमच एखाद्या खासगी भारतीय कंपनीचा उपग्रह अंतराळात पाठवेल. बंगळुरूत अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप पिक्सेल-इंडियाचा ‘आनंद’ हा पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह इस्रोच्या पीएसएलव्ही सी-५१ प्रक्षेपकाद्वारे अंतराळात जाईल.
‘आनंद’कडून पृथ्वीवर होणाऱ्या कोणत्याही घटनेची जवळजवळ २४ तास रिअल टाइम इमेज उपलब्ध होऊ शकेल. पिक्सेलच्या उपग्रहांच्या मदतीने हंगामात पिके आणि मातीत होत असलेल्या बदलांवर नजर ठेवता येऊ शकेल. त्याबाबत काही पावले उचलायची असतील तर त्याचीही सूचना रिअल टाइममध्ये देता येऊ शकेल. मात्र, पिक्सेल थेट शेतकऱ्यांना सूचना देणार नाही, तर एखादी इतर कंपनी किंवा संस्था पिक्सेलकडून डेटा मिळवून शेतकऱ्यांना एसएमएस पाठवेल. अशाच प्रकारे वन क्षेत्रात होत असलेले बदल किंवा स्थानिक संस्थांना रस्ते आणि इतर पायाभूत आराखड्यांत होणाऱ्या बदलांची रिअल टाइम माहिती मिळेल. पृथ्वी निरीक्षण उपग्रहाद्वारे सध्याही अशी निगराणी होते, पण पिक्सेलचा डेटा दर २४ तासांत मिळेल.
पिक्सेलच्या दोन संस्थापकांपैकी एक क्षितिज खंडेलवाल यांनी सांगितले,‘या उपग्रहांमुळे समस्या लवकर ओळखता येतील आणि तत्काळ उपाय सुचवता येऊ शकतील.’
पिक्सेल इंडिया हे एक अर्थ इमेजिंग स्टार्टअप आहे, ते २०२३ पर्यंत एकूण २४ उपग्रह लाँच करेल. सर्व उपग्रह इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या आकार आणि गुंतवणुकीच्या तुलनेत १० पटीने लहान असतील, पण सर्व २४ उपग्रह अंतराळात स्थापित झाल्यानंतर त्यांची क्षमता प्रत्येक २४ तासांत संपूर्ण पृथ्वीच्या कव्हरेजची असेल. गुरुवारी पीएसएलव्ही सी-५० प्रक्षेपकामार्फत सीएमएस-१ च्या यशस्वी लाँचिंगनंतर इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन म्हणाले की, इस्रो आणि भारतासाठी पीएसएलव्हीची पुढील पीएसएलव्ही सी-५१ मोहीम खास असेल, तिच्यामार्फत ‘आनंद’ उपग्रह अंतराळात जाईल. अंतराळ क्षेत्रात सुधारणा लागू झाल्यानंतर खासगी क्षेत्राद्वारे इस्रोच्या सुविधांच्या वापराचा हा पहिला कार्यक्रम असेल. ‘आनंद’सोबत चेन्नईच्या स्पेसकिड्झ या स्टार्टअपचा ‘सतीश’ आणि युनिव्हर्सिटी कन्सॉिर्टयमचा ‘युनिव्हसॅट’ हे दोन लघु उपग्रहही पाठवले जातील.
सिवन म्हणाले- पुढील वर्ष अत्यंत व्यग्र, चांद्रयान आणि आदित्यचे प्रक्षेपण
डॉ. सिवन म्हणाले की, पीएसएलव्ही सी-५१ मोहिमेव्यतिरिक्त २०२१ हे संपूर्ण वर्ष व्यग्रतेचे असेल. इस्रो पुढील वर्षी चांद्रयान-३, आदित्य एल-१ प्रक्षेपित करेल आणि गगनयानची टेस्ट फ्लाइटही पाठवेल. त्याशिवाय जीएसएलव्ही आणि एसएसएलव्हीच्या मोहिमाही सुरू राहतील. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात किमान एक-दोन प्रक्षेपणे होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.