आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. सरकारने यासंबंधीची एक अधिसूचनाही काढली आहे.
या अधिसूचनेत एखाद्या दुसऱ्या देशाची अन्नाची गरज लक्षात घेवून निर्यातीला परवानगी देण्यात येईल. तसेच ज्यांचे ICLC प्रगतीपथावर आहे किंवा शिपमेंटसाठी तयार आहे अशा गव्हाची निर्यात केली जाऊ शकते, असे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
गव्हाचे पीठ 33 रुपये प्रती किलोवर
देशात गव्हाच्या किंमती भडकल्यामुळे किरकोळ बाजारातील गव्हाचे पीठ महागले आहे. हे पीठ सध्या सरासरी 33.14 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. गत वर्षभरात आटा जवळपास 13 टक्क्यांनी महागला आहे. गत 13 मे रोजी हे पीठ 29.40 रुपये प्रती किलो रुपयांने मिळत होते.
गव्हाचे उत्पादन घटण्याची चिन्हे
गव्हाची किंमत येत्या काही दिवसांत आणखी भडकण्याचा अंदाज आहे. 2021-22 च्या रबी हंगामातील गव्हाचे उत्पादन घटण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने स्वतःच उत्पादनाचा अंदाजही कमी केला आहे. यंदा उन्हाळ्याचा हंगाम लवकर आल्यामुळे सरकारने 111.32 दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज 105 दशलक्ष टन म्हणजे 10.50 कोटी टनांपर्यंत कमी केला आहे.
भारताकडून 69 देशांना गव्हाची निर्यात
या बंदीपूर्वी वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले होते की, "चालू आर्थिक वर्षात गव्हाची निर्यात 100 ते 125 लाख टनांचा टप्पा ओलांडू शकते. यावेळी गव्हाच्या निर्यातदार देशांत इजिप्त या नव्या देशाची भर पडली आहे. भारत सध्या जगभरातील 69 देशांना गव्हाची निर्यात करतो." गत आर्थिक वर्षात भारताने 69 देशांना तब्बल 78.5 लाख टन गव्हाची निर्यात केली होती.
केंद्राचा निर्णय शेतकरी विरोधी -काँग्रेस
काँग्रेसने गव्हाच्या निर्यातीवर लावण्यात आलेल्या बंदीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. "सरकारचा गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय शेतकरी विरोधी आहे. सरकारने गव्हाची मुबलक खरेदी केली नाही. त्यामुळी सरकारवर त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याची वेळ आली आहे," असे काँग्रेसने म्हटले आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले -"देशातील गव्हाचे उत्पादन घटले नाही. ते पूर्वीसारखेच आहे. यात थोडाफार फरक असेल. पण, केंद्राला गव्हाची मुबलक खरेदी करण्यात अपयश आल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. आजच्या महागाईचे हेच खरे कारण आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.