आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुपारची वेळ. मध्यम हवा वाहत आहे. भारत-पाक अंतरराष्ट्रीय सीमेजवळील पंजाबच्या कक्कड गावातील गुरुद्वाऱ्यात मोठ्या संख्येने वृद्ध बसलेले आहेत. ९५ वर्षांच्या पांढरी दाढी असलेल्या वृद्धाने दीर्घ श्वास घेतला, नंतर जप सुरू केला. उर्वरित लोकही त्यांचे अनुकरण करायला लागले. हे वृद्ध आहेत करनैलसिंह कक्कड. सुमारे अर्धा तास अरदास चालली. यानंतर चहाची एक मोठी केटली तिथे आणली जाते. तितक्यात आवाज घुमतो- जवान तुम चाय नहीं लोगे..? हा आवाज एका सेवादाराचा होता. ते निमलष्करी दलातून निवृत्त झालेल्या ७६ वर्षीय निरीक्षक जागीर सिंह यांना विनंती करत होते. जागीर यांनी दीर्घकाळ या सीमेचे रक्षण केले आहे.
हे सर्व वृद्ध या ठिकाणी रोज असेच भेटतात आणि एकटेपणा दूर करतात. फाळणीच्या वेदना सहन केलेल्या कक्कड गावात सुमारे ३५०० लोक राहतात. भात आणि उसाचे भरघोस पीक असलेल्या या गावाने वृद्धांचा एकटेपणा दूर करण्यासाठी काही काळापूर्वी हा प्रयोग केला. गावच्या गुरुद्वाऱ्याची लग्नसोहळे, वाढदिवस आणि अंत्यसंस्कारापासून ते अनेक कामांत महत्त्वाची भूमिका आहे. स्थानिक रहिवासी एखादे नवे ट्रॅक्टर किंवा कार खरेदी करतात तेव्हा त्यांचा पहिला थांबा इथेच असतो. काही वर्षांपूर्वी गुरुद्वारासाहिबच्या ग्रंथींनी लोकांना प्रोत्साहित केले. लोकांनी आपला अधिक वेळ गुरुद्वाऱ्यात घालवण्यास सुरुवात करावी, जेणेकरून घरातील एकटेपणा दूर होऊ शकेल, असे सांगण्यात आले.
अनेक वृद्धांनी असे करण्यास सुरुवातही केली. गुरुद्वाऱ्यात लोकांनी स्वखर्चाने फुले असलेल्या टाइल्स लावल्या. मुख्य हॉलमध्ये संगमरवरी दगडाद्वारे नक्षीदार घुमट तयार केले. कुणी उपाशी राहू नये म्हणून लंगर नेहमी उत्तम असावे, हे लकांनी निश्चित केले. लवकरच स्थानिक लोक गुरुद्वाऱ्यात नियमित यायला लागले. पैकी अनेक जण ६० वर्षांवरील होते. त्यांना आपल्या एकटेपणावर उपाय सापडला होता. लष्करात सार्जंट म्हणून निवृत्त झालेले ७४ वर्षांचे बलदेव सिंह सांगतात, ‘घरात वृद्धांचे ऐकण्यासाठी कुणाकडेही वेळ तरी आहे का? मुलांना मोठे होताच दुचाकी व मोबाइल फोन मिळतो. आमच्या काळात असे कुठे होते?’
रांगेत बसून वृद्ध महिला निस्वार्थ सेवा म्हणून भांडी धुवायला लागल्या. मध्येच त्या चर्चाही करतात. गुरुद्वाऱ्यात रोज सेवेसाठी येणाऱ्या ७२ वर्षांच्या लखविंदर कौर म्हणतात, ‘मी इथे आले नसते तर अन्न पचले नसते. आम्ही इथे अरदास करतो, सेवा करतो.’ गुरुद्वाऱ्यात येणाऱ्या पुरुष-महिलांची संख्या जवळपास समान आहे. मात्र, ते वेगवेगळे गोळा होता. महिला स्वयंपाक व सफाई काम करतात. तर पुरुष इतर सेवा करतात. ७० वर्षांच्या जसबीर कौर चार दशकांपासून गुरुद्वाऱ्यात सेवा करत आहेत. इतर महिलांना त्या सांगतात, ‘वाहेगुरुंचे नाव घ्या आणि सेवेत लक्ष घाला.’
जेएनयूमधील समाजशास्त्राचे प्राध्यापक सुरिंदर सिंह जोधका सांगतात, आधी एक झाड होते. त्याखाली वृद्ध संपूर्ण दिवस बसत. आता ते ठिकाण नाहिसे झाल्यासारखे आहे.’ ही सर्व आव्हाने असतानाही वृद्धांना गुरुद्वारा साहिबच्या रूपात वाहेगुरुचा आधार मिळाला आहे. तिथे वाहेगुरुंचे नाव घेऊन ते एकटेपणा विसरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.