आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार दिवसांपासून सरिस्का जंगलात आग भडकत असून 700 हेक्टरहून अधिक जंगलात आग पसरली, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे फोटोसेशन सुरु होते. गंभीर म्हणजे आग आटोक्यात आणण्याऐवजी वनअधिकारी विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची पत्नी अंजली यांना त्यांचे चालक बनून जंगलाची सैर घडवित होते.
विशेष म्हणजे रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जंगलात आग लागली. त्याचा संदेश काही वेळातच अधिकाऱ्यांना वायरलेसद्वार देण्यात आला, पण सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासारख्या व्हीआयपी पाहुण्यांना सैर घडविण्यात व पाहुणचार करण्यातच सर्व अधिकारी एवढे मग्न झाले की, ते आग आटोक्यात आणायचे विसरले.
निष्काळजीपणा एवढा होता की, सरिस्काचे सर्वोच्च अधिकारी, मुख्य वनसंरक्षक आर. एन. मीना यांनी स्वत: अंजली तेंडुलकर यांच्या वाहनाचे सारथ्य केले. सफारीवर नेत दोन - दोन टायगर साईट्सही दाखविल्या.
या व्हीआयपींच्या पाहुणचारात जंगलातील आग आटोक्यात आणणे इतके जड जाईल आणि हेलिकॉप्टर घेऊनही आग आटोक्यात आणणे कठीण होईल हे बहुधा मुख्य वनसंरक्षक मीना यांना माहीत नव्हते. 27 मार्चची आग 30 मार्चपर्यंत 15 ते 20 किलोमीटर जंगलात पसरली आहे. ती विझवण्यासाठी मंगळवारपासून हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. बुधवारीही हेलिकॉप्टरच्या साह्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे.
रेंजर जितेंद्र चौधरी यांना आला संदेश
27 जानेवारीला अंजली तेंडुलकर सायंकाळी 4.30 च्या सुमारास सरिस्काला पोहोचल्या. त्यापूर्वी सुमारे 15 मिनिटे म्हणजे 4.15 वाजता वायरलेसवर बालेटाच्या जंगलात आग लागल्याचा संदेश आला. चौधरी यांनी पथक पाठवतो असे उत्तरही वायरलेस संदेशावर दिले होते. त्यावेळी मुख्य वनसंरक्षक आर. एन. मीना तिथेच उभे होते असे सांगण्यात येत आहे. रेंजरने त्यांना आगीचा संदेशही दिला होता. आग जिथे लागली तेथून ३० किलोमीटर अंतरावर अंजली तेंडुलकर या व्याघ्र सफारी करीत होत्या.
आग जंगलात पसरत राहिली, अधिकारी फोटो काढण्यात होते व्यस्त
आगीचा संदेश मिळाल्यानंतर अंजली तेंडुलकर काही वेळातच तेथे पोहोचल्या. त्यांची गाडी येताच सगळे उभे राहिले. मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांनीच तेथे उपस्थित सर्वांची ओळख करून दिली. खासकरून भाजप नेत्यांची ओळख करून देण्यात त्यांनी अधिक रस दाखवला आणि हे नेते भावी आमदार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अंजली यांच्यासोबत फोटोही काढले.
जिप्सीऐवजी घडवली सरकारी गाडीत सैर
विशेष म्हणजे तेंडुलकर यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी ऑनलाइन बुकिंग केले होते. ऑनलाइन जिप्सीऐवजी त्यांना सरकारी गाडीत सैर धडविण्यात आली. यानंतर मुख्य वनसंरक्षक स्वतः त्या जिप्सीचे चालक झाले. काही लोकांसोबत ते जंगलात सफारीला गेले.
अशोक गेहलोत यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा
सरिस्का येथील आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी जंगलातील आगीच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करीत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आग विझवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर कार्यरत
आग आटोक्यात आणण्यासाठी हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंगळवारी सुमारे 50 हजार लिटर पाणी सरिस्कामध्ये टाकण्यात आले. आग विझवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर कार्यरत आहेत. एका हेलिकाप्टरच्या नऊ फेऱ्या तर दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या तीन फेऱ्या झाल्या असून बुधवारी सकाळपासून दोन्ही हेलिकॉप्टरद्वारे पाणी टाकण्याचे काम सुरू आहे.
आर. एन. मीना यांची बाजू
''आगीची सुचना मिळताच तेथे आमची टीम पोहचली. अंजली तेंडूलकर यांच्या पर्यटनाशी याचा काहीही संबंध नाही. ग्रामस्थांच्या सहकार्यांने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले आहे'' अशी बाजू सरिस्काचे मुख्य वनसंरक्षक आर. एन. मीना यांनी मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.