आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिवंगत मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. 45 मिनिटे झालेल्या या भेटीत हिरेन हत्या प्रकरणावर पुढील पावलावर चर्चा केल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. एवढेच नाही, तर ठाकरे सरकारच्या माफिया पोलिसांनी हिरेन यांची हत्या केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
हिरेन कुटुंबाच्या वेदना अजूनही कमी झाल्या नाहीत-
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की,मनसुख हिरेन यांच्या परिवाराची वेदना अजून कमी झालेली नाही. ज्या यातना त्यांना ठाकरे सरकारमुळे सहन कराव्या लागल्या, त्या अजूनही ताज्या आहेत. परवा एनआयएने दाखल केलेल्या शपथपत्रामुळे मनसुख हिरेन हे व्हिक्टिम असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आता पुढच्या पावलावर आज हिरेन यांच्या पत्नी- मुलाची भेट घेऊन चर्चा केली. पुढच्या आठवड्यात मी एनआयएला स्वत: भेटणार असल्याचंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हिरेन कुटुंबीयांची माफी मागावी
सोमय्या पुढे म्हणाले की, आताची चार्जशीट हा पहिला भाग आहे. परंतु सुरुवातीला या कुटुंबाला जो त्रास सहन करावा लागला, जे ब्लॅकमेलर असल्याचं चित्र रंगवलं गेलं त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना या कुटुंबाची माफी मागावीच लागेल. एनआयएच्या शपथपत्रामुळे मनसुख हिरेन हे व्हिक्टिम ठरल्याचं सिद्ध झाल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.
सचिन वाझे, प्रदीप शर्मांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एका निर्दोष व्यक्तीची हत्या झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी दोन माफियांना पोलीस सेवेत गैरकायदेशीररीत्या नियुक्त केले. हे दोन्ही प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे तुमच्याच पक्षाचे आहेत. या दोन्ही वसुलीबाजांनी हिरेन परिवाराला अनाथ आणि निराधार करण्याचं पाप केलंय. मी एनआयएला भेटून हा तपास पुढे चालावा, या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या फायली शोधाव्या आणि कुणाच्या आदेशामुळे हे झालं त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करणार आहे.
एनआयएच्या शपथपत्रात काय?
मुंबई पोलिस दलातील तत्कालीन सहायक निरीक्षक सचिव वाझे याने मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी प्रदिप शर्मा यांना 45 लाख रूपये दिले होते, असे प्रतिज्ञापत्र 'राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 'ने न्यायालयात दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता. प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने प्रतिज्ञापत्र म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्माला अटक केली होती. तेव्हापासून शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे.
नेमकं काय आहे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेच्या काही दिवसांनीच म्हणजे 5 मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.
तसंच आणखी 8 आरोपींविरोधआत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केली. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.