आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. भारताचे रशिया व युक्रेन या दोन्ही देशांशी व्यापारी संबंध आहेत आणि अनेक भारतीय नागरीक या देशांमध्ये राहतात. या युद्धाचा भारतावरही परिणाम झाला आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाने जगातील ऊर्जा संकटाला खतपाणी घातले आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतालाही याचा फटका बसला आहे. यामुळे ऊर्जा आयात खूप महाग झाली आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या दीक्षांत समारंभात म्हटले.
संपूर्ण जग प्रभावित राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा कोणत्याही प्रदेशाची शांतता आणि सुरक्षा धोक्यात येते. तेव्हा त्याचा संपूर्ण जगावर अनेक प्रकारे परिणाम होतो. युक्रेन-रशिया संघर्षामुळे विविध आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये अन्न संकट निर्माण झाले आहे. मात्र, भारत हा कृषीप्रधान देश असल्याने भारतात अन्नाचे कोणतेही संकट नाही.
पंतप्रधान मोदींचा रशिया-युक्रेनला संवादातून समस्या सोडवण्याचा सल्ला युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिका उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत आहे. रशियावर अनेक देशांनी वेगवेगळे निर्बंध लादले आहेत. रशिया-युक्रेन युद्धावरून जगाला दोन गटात विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भारताने या युद्धातही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनला चर्चेने समस्या सोडवण्याचा सल्ला दिला आहे. कारण युद्ध हा कोणताही वाद सोडवण्यासाठी पर्याय नाही. नुकतेच रशियाच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही आपल्या रशियन समकक्षांना चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला.
विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या युद्धात रशियन सैनिकांचा मृत्यू आणि जखमींची संख्या 100,000 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज अमेरिकेच्या सर्वोच्च जनरलने बुधवारी व्यक्त केला. त्याचवेळी युक्रेनच्या लष्करालाही असाच फटका बसला आहे. युक्रेनमध्ये सुमारे 40 हजार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. लाखो युक्रेनियन लोकांनी इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
तिसरे महायुद्ध ओढावण्याची भीती
रशियाचे मागील फेब्रुवारी महिन्यापासून युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे. प्रारंभी या युद्धात युक्रेन अवघ्या एक-दोन दिवसांत नांगी टाकेल, असे वाटले होते. पण त्याने आतापर्यंत रशियाला चांगलेच झुंजवले आहे. सद्यस्थिती पाहता युक्रेन आणखी काही महिने सहजपणे रशियाला लढा देईल, असे दिसून येत आहे. दोन्ही देशांतील या युद्धामुळे जगावर तिसरे महायुद्ध ओढावण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
G-20 मध्ये सहभागी होणार नाहीत पुतिन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 मध्ये सहभागी होणार नाहीत. वृत्तसंस्था एएफपीनुसार, इंडोनेशियातील बाली येथे 15-16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेला पुतिन उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह व्हर्च्युअली हजर असतील. तथापि, इंडोनेशियातील रशियन दूतावासाच्या प्रोटोकॉल चीफ युलिया टॉमस्काया म्हणाल्या - पुतीनदेखील व्हर्च्युअली सहभागी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.