आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोठा कट:दिल्लीत ‘इसिस’च्या अतिरेक्याला अटक; राम मंदिर होते निशाण्यावर, पाकिस्तानी हस्तकाच्या इशाऱ्यावर काम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्टला हल्ल्याचा होता कट, 15 किलो आयईडी, शस्त्रास्त्रे जप्त

दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळून लावत इस्लामिक स्टेटच्या (इसिस) अब्दुल ऊर्फ अबू युसूफ या अतिरेक्याला अटक केली आहे. अटकेआधी शुक्रवारी धौला कुआं रिज रोडजवळ पोलिस व अतिरेक्यात गोळीबारही झाला. अतिरेक्याकडून १५ किलो आयईडी एक पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आयईडीला एका प्रेशर कुकरमध्ये फिट करण्यात आले होते. एनएसजीच्या मदतीने ते नष्ट करण्यात आले आहे.

काेर्टाने अतिरेक्याला ८ दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. अयोध्येत उभारले जात असलेले राम मंदिरही त्याच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तो पाकिस्तानी हस्तकाच्या इशाऱ्यावर काम करत होता. यानंतर दिल्ली, नोएडा व यूपीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

युसूफला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या इस्लामिक स्टेट खुरासान प्रांताच्या कमांडरकडून सूचना मिळत होत्या. त्याला पाकिस्तानी हस्तक अबू हुफैजाने प्रशिक्षित केले होते. तो काश्मिरातील इसिस नेटवर्कच्याही संपर्कात होता.

१५ ऑगस्टला हल्ल्याचा होता कट : अतिरेकी अबू युसूफ यूपीच्या बलरामपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडे अनेक ओळखपत्रे आणि पत्ते आहेत. त्याने इंटरनेटवर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकून काही महिन्यांपूर्वी आपल्या गावात स्फोटाची चाचणीही घेतली होती. लॉकडाऊनमुळे त्याला कट प्रत्यक्षात उतरवता आला नाही. १५ ऑगस्टच्या सुमारास तो गर्दीच्या जागी बॉम्बस्फोट घडवणार होता. मात्र कडेकोट सुरक्षेमुळे त्याचे मनसुबे उधळले गेले.