इस्त्रायलची पॅलेस्टाईनवर एअरस्ट्राइक:हमासचा कमांडर तायसीर जबारी ठार; इस्त्रायलवर 2 तासांत 100 रॉकेट्सचा मारा
इस्त्रायल व पॅलेस्टाईनमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलने शुक्रवारी गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. त्यात पॅलेस्टाईनच्या हमास या कथित अतिरेकी संघटनेचा सीनिअर कमाडंर तायसीर अल जबारी याचा खात्मा झाला. हमासने या हल्ल्यात अन्य 10 जण ठार झाल्याचे व 70 हून अधिक जण जखमी झाल्याचाही दावा केला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, पॅलेस्टाईनची संघटना वेस्ट बँकचे नेते अबू अल-अता यांच्या अटकेच्या विरोधात इस्त्रायलवर हल्ले करण्याची धमकी देत होती. इस्त्रायलच्या सैन्याने 2019 मध्येच अल-अताला ठार केले होते.
हल्ल्यात ठार झालेला तायसीर अल जबारी. तो अल-अताच्या मृत्यूनंतर कमांडर झाला होता.
हल्ल्यात 5 वर्षीय बालकाचा बळी
इस्त्रायलने गाझा पट्टीवर एअरस्ट्राइक केल्यानंतर हमासनेही इस्त्रायलवर 2 तासांत 100 हून अधिक रॉकेट्सचा मारा केला. यातील 9 रॉकेट्स गाझा पट्टीतच पडले. हमासने या हल्ल्यात एका 5 वर्षीय मुलीसह 10 जणांचा बळी गेल्याचा दावा केला आहे. तर इस्त्रायलच्या डिफेंस फोर्सने (आयडीएफ) आपल्या एअरस्ट्राइकमध्ये हमासचे किमान 15 अतिरेकी ठार झाल्याचे म्हटले आहे.
हमासने गाझावर झालेल्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलीसह 10 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायल व पॅलेस्टाईनमध्ये काय आहे वाद?
इस्त्रायल व पॅलेस्टाईनमध्ये गाझा पट्टीवरून वाद सुरू आहे. गाझा पट्टी इस्त्रायल व इजिप्तच्या मध्यभागी आहे. तिच्यावर सध्या हमासचे नियंत्रण आहे. या संघटनेचा इस्त्रायलला विरोध आहे. सप्टेबर 2005 मध्ये इस्त्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले होते. 2007 मध्ये इस्त्रायलने या भागावर विविध निर्बंध लादले होते. पॅलेस्टाईनने वेस्ट बँक व गाझा पट्टीत स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.
गाझा पट्टीचा हा भाग हमासच्या ताब्यात आहे. येथे इस्त्रायल व हमासमध्ये मागील 15 वर्षांत 4 युद्ध झाले आहेत.
अखेर हा संघर्ष किती जुना आहे?
- हा संघर्ष जवळपास 100 वर्षांपासून सुरू आहे. सद्यस्थितीत जिथे इस्त्रायल अस्तित्वात आहे, तिथे पूर्वी तुर्कीचे शासन होते. त्याला ओटोमान साम्राज्य म्हटले जात होते. 1994 मध्ये पहिले महायुद्ध झाले. तुर्कीने या युद्धात मित्र राष्ट्रांविरोधात मैदानात उतरलेल्या देशांची साथ दिली. मित्र राष्ट्रांत ब्रिटनचा समावेश होता. त्यामुळे तुर्की व ब्रिटन एकमेकांपुढे आले. त्यावेळी ब्रिटीश साम्राज्य यशोशिखरावर होते. त्यामुळे ब्रिटनने युद्ध जिकून ओटोमान साम्राज्य आपल्या ताब्यात घेतले.
- या काळात झिओनिझमची भावना टोकाला पोहोचली होती. ही एक राजकीय विचारधारा होती. तिचा उद्देश एक स्वतंत्र व वेगळे यहुदी राज्य स्थापन करण्याचा होता. यामुळे जगभरातील यहुदींनी पॅलेस्टाईनकडे धाव घेतली. 1917 मध्ये ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स बेलफोर यांनी एका घोषणेद्वारे ब्रिटन पॅलेस्टाईनला यहुद्यांची मातृभूमी बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
हा नकाशा पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीचा आहे. त्यात दिसून येणाऱ्या ओटोमान साम्राज्यात आजच्या इस्त्रायल, पॅलेस्टाईन, इजिप्त, तुर्कीसह आसपासच्या अनेक देशांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
- 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले. या युद्धात ब्रिटनला खूप नुकसान सोसावे लागले. आता त्याची महासत्ता लयास गेली होती. दुसरीकडे, यहुदींचे लोंढे पॅलेस्टाईनकडे जात होते. त्यामुळे दुसऱ्या देशांनी ब्रिटनवर त्यांची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी दबाव टाकला. अखेरीस ब्रिटनने स्वतःला या प्रकरणापासून विभक्त केले. त्यानंतर हे प्रकरण 1945 साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्राकडे गेले.
- 29 नोव्हेंबर 1947 रोजी संयुक्त राष्ट्राने पॅलेस्टाईनची 2 भागांत फाळणी केली. एक अरब राज्य व दुसरा भाग इस्त्रायल बनले. जेरुसलेमला यूनोने आंतरराष्ट्रीय सरकारच्या ताब्यात ठेवले.
- अरब देशांनी यूनोचा हा फैसला धुडकावून लावला. त्यांनी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्याला कमी भूखंड मिळाल्याचा आरोप केला. फाळणीनंतर पॅलेस्टाईनच्या वाट्याला एकूण क्षेत्रफळापैकी अर्ध्याहून कमी क्षेत्रफळ मिळाले. प्रत्यक्षात फाळणीपूर्वी अरबांकडे 90 टक्क्यांहून अधिक जमिनीवर कब्जा होता.
- त्यानंतर पुढील वर्षी इस्त्रायलने स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. अमेरिकेने तत्काळ एक देश म्हणून इस्त्रायलला मान्यता दिली. त्यानंतर अरब देश व इस्त्रायलमध्ये अनेक युद्ध झाले.