आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुराच्या संकटाशी सामना करीत असलेल्या राज्याला महसुलाची गरज आहेच, त्यामुळे आसाममध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे स्वागत आहे. चालून आलेल्या लक्ष्मीला पाठ दाखवणार नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर व्यक्त केली. आसाममध्ये सध्या महापुरामुळे हाहाकार उडाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे आघाडी सरकारला घरघर लागलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत सध्या एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांनी छेडले असता, ‘अहो, एवढेच काय, आसाम आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भूकंपाचा केंद्रबिंदू झाला तरी मला आनंदच होईल,’ असे मुख्यमंत्री सरमा मिश्किलपणे म्हणाले.
गुवाहाटीत अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. या हॉटेलच्या खोल्या भरल्या तर मला महसूलही वाढेल. आसाम महापुराच्या संकटाशी मुकाबला करतोय. अशा वेळी जीएसटीच्या माध्यमातून महसूल मिळणार असल्यास आमच्यासाठी ते चांगलेच आहे, असे सर्मा म्हणाले.
आसाममधील ३२ जिल्ह्यांतील ५५ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला असून महापुरामुळे आतापर्यंत ८ बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात सर्मा यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केला. ते म्हणाले, आमदार आले तर त्यावरून वादंग होण्याचे काय कारण आहे ? पुरामुळे अनेक हॉटेल ओस पडलेत. खोल्या रिकाम्या आहेत. अशा वेळी चालून आलेल्या लक्ष्मीकडे कोण पाठ फिरवेल ? बंडखोर आमदारांना भेटला का? असे विचारले असता तसे वाटल्यास पाच मिनिट भेटूही शकतो, परंतु मला त्याची गरज वाटत नाही. मात्र माझे काही सहकारी त्यांच्या संपर्कात आहेत, असे सर्मा यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.