आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारणत: सरकारी शाळांमध्ये खोल्यांचा तुटवडा किंवा एका खोलीत दोन-तीन वर्ग सुरू असल्याची चित्रे समोर येतात. राजस्थानच्या जालोर येथील परिस्थिती याच्या उलट आहे. उत्तम शाळेची इमारत मिळवण्यासाठी गावागावांत शर्यत सुरू आहे. २ ते ४-५ कोटी रुपये खर्चून शाळा बांधून ग्रामस्थ शासनाला ती भेट देत आहेत. जालोर गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत. बहुधा हेच लोक शाळा बांधतात, पण जर गावात कुणी मोठा शेठ नसेल तर अनेक लोक मिळून एकच शाळा बांधतात. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे खेड्यापाड्यातील मुलांना व शिक्षकांना आधुनिक सुविधांसह उत्तम इमारती मिळत आहेत.
गावातील शाळेशी त्यांची अशी ओढ आहे की, शाळा बांधण्यासाठी सरकारला पैसे देण्याऐवजी ते स्वतः शाळेची इमारत बांधून सरकारच्या ताब्यात देतात. स्वत:चे घर बांधताना बांधकामाच्या दर्जाची जशी काळजी घेतली जाते, तशीच शाळा बांधताना घेतली जाते. जालोर ते भीनमाळदरम्यान अकोली येथील जुन्या शाळेच्या आवारात गुलाबी दगडांनी नवीन इमारत बांधण्यात येत आहे. २.२० कोटी खर्चातून येथे जितेंद्र खिंवसरा आपल्या आईवडिलांच्या नावे शाळा बांधत आहेत. रेवतडा गावात पाबुदेवी गोराजी ट्रस्ट ४.१६ कोटीं खर्चातून, गुडाबालोतानमध्ये कांतिबाई रामानी ट्रस्ट २.२५ कोटी खर्चातून, भुंडवात महावीर जैन श्वेतांबर पेढी ३.३० कोटी खर्चातून तर दादालमध्ये छत्र शांती चॅरिटेबल संस्था २.५१ कोटी खर्चातून शाळा उभारत आहे. बी ढाणीमध्ये मनोजकुमार, पांचाराम बिश्नोई २.२६ कोटी खर्चाची शाळा बांधत आहेत. तरा हाडेचामध्ये बाबूलाल भन्साळी ३.५ कोटींतून शाळा बनवत आहेत. यापूर्वी भन्साळींनी या गावात रुग्णालय आणि दोन शाळा बांधल्या आहेत.
डझनभर नव्या शाळा बनताहेत : जिल्ह्यात अशा डझनभर शाळा उभारल्या जात आहेत. तेवढ्याच सरकारकडे सुपूर्द केल्या आहेत. नरसाणात माजी ग्रामसेवक जसवंतसिंह बालावत यांच्या नेतृत्वात भवन निर्माण समिती २.२८ कोटींची शाळा उभारत आहे. जसवंत म्हणाले, आमच्या गावात कुणी मोठा दाता नाही. आम्ही अनेक स्थलांतरितांच्या मदतीने शाळा बांधत आहोत.फर्निचरसह एका खोलीसाठी ७.५० लाख रुपयांचे योगदान मिळवले आहे. याच प्रकारे १८ खोल्या आणि ३ हॉल बनवत आहोत.
उत्कृष्ट शाळा बांधून देणे प्रतिष्ठेचा प्रश्न
जालोरचे शिक्षक आणि एनसीईआरटी अभ्यासक्रम समितीचे सदस्य संदीप जोशी म्हणाले,‘येथे शाळा बांधणारे अपेक्षित खर्चापेक्षाही खूप जास्त पैसे खर्च करत आहेत. आपल्या गावातील शाळा सर्वोत्तम असावी ही प्रतिष्ठेची बाब बनते. त्यांना फक्त थोडे अधिक प्रोत्साहन हवे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.