आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर:हंदवाडामध्ये कमांडींग ऑफिसर आशुतोष शर्मासह पाच शहीद, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; 5 वर्षांनंतर दहशतवाद्यांच्या चकमकीत कमांडिग ऑफिसर गमावला 

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मासहित 5 जवान शहीद

हंदवाडा येथे शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत सैन्याच्या 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मासहित 5 जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे, नॉर्थ काश्मीरमधील एका घरातील कुटुंबाला दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते, त्यांना वाचवण्यासाठी सैन्य आणि पोलिसांची टीम गेली होती. घरातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

शहीद झालेल्यांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा व्यतिरिक्त मेजर अनुज, सब इंस्पेक्टर शकील काजी, एक लान्स नायक आणि एक रायफलमॅन आहे. ही चकमक हंदवाडाच्या छांजीमुल्लाह गावात शनिवारी दुपारी 3 वाजता सुरु झाली होती. 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांना मागील वर्षीच दुसऱ्यांदा सेना मेडल मिळाले होते. 

5 वर्षानंतर दहशतवाद्यांच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर शहीद 

> सैन्याने जम्मू-काश्मिरमध्ये पाच वर्षांनंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरला गमावले. याआधी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलात झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते महाराष्ट्रातील रहिवासी होते. कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती 2017 मध्ये सैन्यात दाखल झाली.

> 27 जानेवारी 2015 रोजी 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमएन राय काश्मिरच्या त्रालमध्ये चकमकीत शहीद झाले होते. कर्नल राय गोरखा रेजिमेंटमधून होते आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून होते. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.

> काश्मीरचे कोर कमांडर राहिलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांच्या म्हणण्यानुसार मी या शूर माणसांच्या बलिदानास अभिवादन करतो. एकीकडे दु: ख असले तरी दुसरीकडे गर्व आहे.

10 तास चाललेल्या चकमकीची संपूर्ण कहाणी

हंदवाडाच्या जंगली भागात दहशतवादी लपून बसल्याची पक्की माहिती शनिवारी सैन्याला मिळाली. त्यानंतर सैन्याने तत्काळ या भागात शोध मोहीम राबविली. मात्र, त्यात कोणताही दहशतवादी सापडला नाही. दुपारी तीनच्या सुमारास सैन्याला पुन्हा बातमी मिळाली की जंगल क्षेत्रापासून 3 किमी दूर छाजीमुल्ला गावातील एका घरात काही दहशतवादी लपून बसले आहेत आणि त्यांनी लोकांना बंदी बनवले आहे.

बंदी लोकांना मुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मा स्वतः या पथकाचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत एक मेजर आणि जम्मू-कश्मीरच्या पोलिसांसह पाच लोकांची टीम होती. 

सैनिक जेव्हा घरात घुसले तेव्हा दहशतवादी जवळच्या गायींच्या बंदिवासात लपले होते. सुरक्षा दलाने लोकांना घरातून सुखरुप बाहेर काढले. तेवढ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दरम्यान, सुरक्षा दलांकडून कोणतीही माहिती येणे बंद झाले. अनेक तास सुरक्षा दलांचा संपर्क तुटला होता.  दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांचे कम्युनिकेशन डिव्हाइस घेतले होते, असे मानले जात आहे. 

शनिवारी रात्री चकमक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. या पावसात चकमक सुरुच होती. रविवारी सकाळी सातच्या सुमारास गोळीबार थांबला. यानंतर सैन्याने घराची तपासणी केली. त्यानंतर लष्कराच्या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाल्याची माहिती मिळाली, परंतु यावेळी कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह 5 सैनिकही शहीद झाले.

शहीद झालेले जवान 

> कर्नल आशुतोष शर्मा, 21 राष्ट्रीय रायफल्स, 19 गार्ड्स  

> मेजर अनुज सूद,  21 राष्ट्रीय रायफल्स, 19 गार्ड्स

> नायक राजेश,  21 राष्ट्रीय रायफल्स, 3 गार्ड्स

> लान्स नायक दिनेश, 21 राष्ट्रीय रायफल्स, 17 गार्ड्स

> उपनिरीक्षक शकील काजी, जम्मू कश्मीर पोलिस

यावर्षी 62 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला

यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत जम्मू-कश्मीरच्या विविध भागांत झालेल्या चकमकींत 62 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान दहशतवाद्यांकडून सीमेपलीकडून सतत घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...