आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेस पक्षाशी अनेक दशकांचे जुने संबंध तोडले आहेत. मात्र, यातच आता त्यांनी पुन्हा पक्षाचे कौतुक केले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ काँग्रेसच आव्हान देऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तसेच आम आदमी पार्टी (AAP) हा फक्त दिल्लीपुरता पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष धोरणाच्या विरोधात नव्हतो, तर कमकुवत व्यवस्थेच्या विरोधात होते, असे माजी काँग्रेस आझाद म्हणाले. गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी करावी अशी माझी अजूनही इच्छा आहे. काँग्रेस हा हिंदू, मुस्लिम, शेतकरी सर्वांना सोबत घेऊन जाणार पक्ष आहे, असे ते श्रीनगरमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले.
आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला
आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवताना आझाद म्हणाले की, आम आदमी पक्ष या राज्यांमध्ये काहीही करू शकत नाही. ते पंजाबमध्ये अपयशी ठरले आहेत आणि पंजाबचे लोक त्यांना पुन्हा मतदान करणार नाहीत. आप हा फक्त दिल्लीचा पक्ष आहे. ते पंजाबला सक्षमपणे चालवू शकत नाहीत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसच भाजपला आव्हान देऊ शकते. कारण त्यांच्याकडे संयुक्त धोरण आहे.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे स्वागत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या विचारात असलेल्या संकेतावर ते म्हणाले की, मी संसदेत हा मुद्दा अनेकदा मांडला आहे आणि केंद्र सरकारने तसे केल्यास निर्णयाचे स्वागत होईल. गुलाम नबी आझाद हे डोडा दौऱ्यावर असून येत्या काही दिवसांत ते अनेक रॅलींना संबोधित करणार आहेत.
आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस सोडली होती
26 ऑगस्ट 2022 रोजी आझाद यांनी काँग्रेस पक्षाशी असलेले 52 वर्षे जुने नाते सोडले. ऑक्टोबरमध्ये आझाद यांनी त्यांच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या नऊ वर्षांत पक्ष ज्या पद्धतीने चालवला. त्याबद्दल पक्ष नेतृत्वावर विशेषतः राहुल गांधींवर निशाणा साधला होता. पाच पानी पत्रात आझाद यांनी दावा केला होता की, सोनिया गांधी या केवळ नाममात्र प्रमुख होत्या आणि सर्व प्रमुख निर्णय राहुल गांधी किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए घेतात.
गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये थेट लढत
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये भाजपने सलग 6 विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आपला प्रचार मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 'आप'बद्दल बोलायचे झाले तर मागील निवडणुकांप्रमाणे यंदाही आम आदमी पार्टीही दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे, त्यामुळे ही तिरंगी लढत होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.